इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी. Pudhari.
आंतरराष्ट्रीय

Iran vs USA Conflict 2026 | 'आखातात अमेरिकेला स्थान नाही, असेल तर फक्त समुद्राच्या तळाशी'; इराणचे खामेनी कडाडले

Iran vs USA Conflict 2026 | अण्वस्त्र निर्बंधांना दिला नकार

पुढारी वृत्तसेवा

Iran vs USA Conflict 2026

तेहरान : आम्ही आणि पर्शियन आखात तसेच ओमानच्या आखातातील आमचे शेजारी देश एकाच नशिबाचे वाटेकरी आहोत. परकीय हजारो किलोमीटर दुरून इकडे हाव आणि द्वेषाने येतात, त्यांना या भागात स्थान नाही. असेलच तर ते केवळ समुद्राच्या तळाशी स्‍थान आहे, अशा शब्‍दांमधृये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी आज (दि. ३० एप्रिल)अमेरिकेवर हल्‍लाबोल केला. अमेरिकेचा उल्लेख 'ग्रेट सैतान' (Great Satan) असा करत, त्यांनी इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्‍याचे वृत्त 'असोसिएटेड प्रेस'ने दिले आहे.

पर्शियन आखाती प्रदेशात अमेरिकेला कोणतेही स्थान नाही

सरकारी टेलिव्हिजनवर वाचून दाखवण्यात आलेल्या लेखी निवेदनात खामेनी म्हणाले की, इराणचे धोरणात्मक कार्यक्रम हे 'चर्चेचा विषय' (non-negotiable) नसून ते राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच, पर्शियन आखाती प्रदेशात अमेरिकेला कोणतेही स्थान नाही, असेही त्‍यांनी ठणकावले.

९० कोटी इराणची जनता लष्करी ताकदीचे रक्षण करेल

खामेनी यांनी इराणच्या तांत्रिक आणि लष्करी क्षमतेचे वर्णन 'राष्ट्रीय संपत्ती' असे केले. "देशांतर्गत आणि परदेशात राहणारे ९० दशलक्ष (९ कोटी) अभिमानी इराणी नागरिक इराणची ओळख, आध्यात्मिक, मानवी, वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतांना आपली राष्ट्रीय संपत्ती मानतात. नॅनो-टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीपासून ते अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेपर्यंत, प्रत्येक गोष्टीचे रक्षण ते आपल्या भूमी आणि आकाशाप्रमाणेच करतील," असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जागतिक तेल बाजारावर सावट

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विधान समोर आले आहे. निर्बंधांमुळे इराणच्या तेल क्षेत्रावर परिणाम होत असून टँकरच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. यामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, 'ब्रेंट क्रूड'च्या किमती प्रति बॅरल १२६ डॉलर्सपर्यंत पोहोचल्या होत्या. जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी सुमारे एक पंचमांश भाग 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मधून जातो. या महत्त्वाच्या जलमार्गावर इराणचे सामरिक वर्चस्व असल्याने ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिका-इराण संघर्ष कायम

सध्या युद्धविराम असला तरी, अमेरिका आणि इराण यांच्यात निर्बंध, अण्वस्त्र चर्चा आणि सागरी नियंत्रणावरून वाद सुरूच आहे. इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमावरील चर्चा लांबणीवर टाकण्याचे प्रस्ताव दिले आहेत, तर वाशिंग्टनने इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम शांततेसाठी असल्याचा दावा तेहरानने केला असला, तरी त्यांनी युरेनियमचे समृद्धीकरण शस्त्रास्त्रांच्या पातळीपर्यंत नेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT