इराण आणि इस्रायल युद्धाचा आज (दि. २३ जून) अकरावा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. इस्रायली सैन्याने इराणमधील सहा विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत. मशहाद, तेहरान, हमादान, देझफुल, शाहिद बख्तियारी आणि तबरीझ या विमानतळांना लक्ष्य केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. तर इराणने इस्रायली हर्मीस ड्रोन पाडला आहे.
इस्त्रायलने लष्कराने निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांनी ड्रोन हल्ल्यांद्वारे इराणची १५ लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हवाई पट्ट्या, भूमिगत बंकर, इंधन भरणारे विमान आणि इराणच्या F-14, F-5 आणि AH-1 सारख्या लढाऊ विमानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्रायली हवाई दलाने रविवारी (दि. २२ जून) रात्री उशिरा इराणमधील शाहरुद येथील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इंजिन निर्मिती कारखान्यावर बॉम्बहल्ला केला. हे ठिकाण इस्रायलपासून सुमारे २००० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात अनेक इंजिन निर्मिती यंत्रे आणि आवश्यक उपकरणे नष्ट झाली. याशिवाय इस्रायलने तेहरान, केरमानशाह आणि हमादान येथेही हवाई हल्ले केले.
इराणने पश्चिम भागात इस्रायलचा हर्मीस ड्रोन पाडला. याची पुष्टी इस्रायली सैन्यानेही केली आहे. एक निवेदन जारी करून 'आयडीएफ'ने म्हटले आहे की आज सकाळी पश्चिम इराणमधील खोरमाबाद येथे एक ड्रोन पाडण्यात आला आहे.इराणी माध्यमांनी दावा केला आहे की हा ड्रोन हर्मीस मॉडेलचा होता.गेल्या आठवड्यातही इस्फहानमध्ये इस्रायली हर्मीस ९०० यूएव्ही पाडण्यात आला होता.
इराणने अमेरिकेला त्यांच्या अणु तळांवर हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इराणचे नवे लष्करप्रमुख मेजर जनरल अमीर हतामी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने इराणविरुद्ध गुन्हा केला आहे तेव्हा त्यांना योग्य उत्तर मिळाले आहे आणि यावेळीही तेच होईल.
इराणच्या रेड क्रिसेंटच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने आपल्या हल्ल्यांमध्ये इराणमधील आठ वैद्यकीय केंद्रांना लक्ष्य केले आहे. यामध्ये वली असर, मोटाहारी बर्न , खातम रुग्णालयांसह एक कल्याण केंद्र, रेड क्रिसेंटचे पुनर्वसन केंद्र आणि रेड क्रिसेंटच्या सोलाह (शांती) इमारतींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, करमानशाह येथील फराबी रुग्णालयाच्या आयसीयूला (ICU) जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा आरोपही इराणने केला आहे.