air india file photo
आंतरराष्ट्रीय

Iran Israel war: इराण युद्धामुळे विमान प्रवास महागला! वाढीव तिकीट दरांपासून वाचण्यासाठी प्रवाशांनी काय करावे?

Airline Ticket Price Hike Iran War Travel Tips: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ आणि इंधन अधिभार लावण्यास सुरुवात केली असून, याचा थेट फटका पर्यटकांना बसणार आहे. अशावेळी प्रवाशांनी काय करावे? जाणून घ्या.

मोहन कारंडे

Iran Israel War Impact on Flight Prices

वॉशिंग्टन: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता जागतिक विमान वाहतूक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विमान प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ आणि इंधन अधिभार लावण्यास सुरुवात केली असून, याचा थेट फटका पर्यटकांना बसणार आहे.

इंधन टंचाईचे संकट

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) इशारा दिला आहे की, युरोपीय देशांमधील विमान इंधनाचा साठा काही आठवड्यांतच संपू शकतो. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रति बॅरल ९९ डॉलर असलेले इंधन एप्रिलच्या सुरुवातीला २०९ डॉलरवर पोहोचले आहे. या दरवाढीमुळे 'एअर कॅनडा' सारख्या मोठ्या कंपन्यांनी न्यूयॉर्कसह अनेक महत्त्वाचे मार्ग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड, डेल्टा, एअर फ्रान्स आणि कॅथे पॅसिफिक यांसारख्या कंपन्यांनीही विमान फेऱ्यांत कपात केली असून तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.

प्रवाशांनी काय करावे?

वाढत्या महागाईच्या काळात प्रवाशांनी आपले आर्थिक नियोजन कोलमडू नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत विमान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. युद्ध कधी थांबेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा, प्रवासाचे नियोजन निश्चित असल्यास लवकरात लवकर तिकीट बुक करणे फायद्याचे ठरेल. युद्ध थांबल्यानंतरही इंधन पुरवठा सुरळीत होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

शनिवार-रविवारऐवजी आठवड्याच्या मधल्या दिवशी प्रवास केल्यास तिकीट दर कमी मिळू शकतात. तसेच, मुख्य शहराऐवजी त्याच्या जवळच्या दुसऱ्या विमानतळाचा पर्याय निवडल्यास पैशांची बचत होऊ शकते. 'बेसिक इकॉनॉमी' तिकीट स्वस्त असले तरी त्यात बदल करणे कठीण असते. त्याऐवजी थोडे जास्त पैसे देऊन रिफंडेबल किंवा लवचिक तिकीट घेतल्यास ऐनवेळी योजना बदलल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल. अनेक कंपन्यांनी चेक-इन बॅगेजसाठी शुल्क वाढवले आहे. शक्य असल्यास फक्त 'कॅरी-ऑन' बॅगसह प्रवास करावा, जेणेकरून अतिरिक्त शुल्क वाचेल.

रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर ठरेल फायदेशीर

विमानाची रोख तिकिटे महागली असली तरी, 'रिवॉर्ड पॉइंट्स' किंवा 'एअर माईल्स'चे मूल्य अद्याप स्थिर आहे. अनेक क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या पॉइंट्सचा वापर करून तुम्ही विमान तिकीट बुक करू शकता. सध्याच्या स्थितीत रोख पैसे खर्च करण्यापेक्षा पॉइंट्स वापरणे अधिक फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकूणच, आखाती देशांतील तणाव जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत विमान प्रवास महागडाच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी 'घाई' न करता 'स्मार्ट' नियोजनावर भर देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT