आंतरराष्ट्रीय

Iran attack Dimona| इराणच्‍या हल्ल्याने इस्रायलमधील ‘लिटिल इंडिया’ दिमोना हादरले, बेने इस्रायलींचे महाराष्ट्राशी नाते काय?

दिमोनामध्ये ७,५०० भारतीय-ज्यू समुदाय शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के

पुढारी वृत्तसेवा

Iran attack Dimona

जेरुसलेम : या शहरातील गल्ल्यांमध्ये मराठीसह हिंदी शब्दही कानावर पडतात. येथेही क्रिकेटचे चाहते मोठे आहेत. येथील दुकानांमध्ये सोहनपापडी, गुलाबजाम, पापडी चाट आणि भेळपुरी सारखे भारतीय पदार्थ सहज मिळतात.... हे वर्णन भारतातील एखाद्या शहराचे नसून इस्रायलमधील दिमोना शहराचे आहे. इस्रायलच्या अण्वस्त्र साठ्यापासून २० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या शहरात भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी वस्ती आहे. शनिवारी इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दिमोना शहराचे प्रचंड नुकसान झाले असून ३३ जण जखमी झाले आहेत. जाणून घेऊया या शहराचे भारताशी असणाऱ्या नात्याविषयी...

इस्रायलमधील ‘लिटिल इंडिया’

दिमोना शहराला 'लिटिल इंडिया' म्हणून ओळखले जाते. येथील ७,५०० भारतीय-ज्यू समुदाय शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के आहे. तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, १९५० आणि १९६० च्या दशकात भारतातून ज्यू समुदायाचे इस्रायलमध्ये मोठे स्थलांतर झाले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील (बेने इस्रायली), केरळमधील (कोचिनी ज्यू) आणि कोलकाता येथील (बगदादी ज्यू) समुदायाचा समावेश आहे. अलिकडच्या वर्षांत मिझोराम आणि मणिपूरमधील (बेने मेनाशे) ज्यू देखील इस्रायलमध्ये स्थायिक झाले आहेत. येथील भारतीय समुदाय प्रामुख्याने हिरे व्यापारी, आयटी व्यावसायिक आणि वृद्धांची काळजी घेणारे (केअरगिव्हर्स) म्हणून कार्यरत आहे.

संस्कृती आणि परंपरांची जपणूक

हा समुदाय केवळ आहाराद्वारेच नाही, तर सण-उत्सवांच्या माध्यमातूनही एकत्र येतो. येथे कोचिनी ज्यू 'ओणम' साजरा करतात, तर दिवाळीच्या निमित्ताने बेने इस्रायली आणि बगदादी ज्यू एकत्र येतात. इस्रायली सुपरमार्केटमध्ये मिळणारा 'रस्क' आणि चहाचा कप त्यांच्या गप्पांचा अविभाज्य भाग असतो. नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या भारतीय चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी झाली होती, तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या पहिल्या भारतीय संगीत महोत्सवाची सर्व तिकिटे हातोहात विकली गेली होती. दिमोना व्यतिरिक्त हैफा, तेल अवीव, अराद, नेतन्या आणि अफुला या शहरांमध्येही भारतीय वंशाचे लोक राहतात.

बेने इस्रायलींचे महाराष्ट्राशी नाते काय?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरात इस्रायलची स्थापना झाली. या नव्याने स्थापन झालेल्या देशात राहण्यासाठी जगभरातून ज्यू तिकडे स्थलांतर झाले. भारतातूनही बेने इस्रायली, कोचिनी, बगदादी आणि बेने मनाशे ज्यू तिकडे स्थलांतरित झाले. यातील बेने इस्रायली हे मराठी बोलणारे, महाराष्ट्रातील ज्यू होते. आज बेने इस्रायली समुदाय दक्षिण इस्रायलमध्ये बीरशाबा येथे स्थायिक झालेला दिसून येतो. त्यानंतर रामले, लोद, अश्दोद, किर्यात गात, दिमोना, येरुखाम येथे ते मोठ्या संख्येने राहत आहेत.

इराणने दिमोनाला का केले लक्ष्य?

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इस्रायलमधील दिमोना आणि अराद शहरांवर झालेली क्षेपणास्त्रे रोखण्यात त्यांना अपयश आले. या हल्ल्यात ३३ जण जखमी झाले असून, यामध्ये एका १० वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. इराणने स्पष्ट केले की, नातान्झ अणू केंद्रावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी दिमोनाला लक्ष्य केले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ यांनी म्हटले की, "जर इस्रायल सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दिमोना भागात क्षेपणास्त्रे रोखू शकत नसेल, तर हे युद्धाच्या नवीन टप्प्याचे संकेत आहेत."

दिमोना इस्‍त्रायच्‍या अण्वस्त्रांचे संशोधन केंद्र

नेगेव वाळवंटात स्थित असलेल्या दिमोना येथील 'शिमोन पेरेस नेगेव न्यूक्लियर सेंटर'ला इस्रायल एक संशोधन केंद्र मानतो. या केंद्राचे १९५८ मध्ये सुरू झालेले बांधकाम १९६४ मध्ये पूर्ण झाले. मात्र, १९६० च्या अमेरिकन गुप्तचर अहवालानुसार, या ठिकाणी प्लुटोनियम तयार करण्याचा प्रकल्प असून तो अण्वस्त्रांसाठी महत्त्वाचा आहे. इस्रायलने अद्याप अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT