India UK Free trade agreement 2025
लंडन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युके भेटीदरम्यान भारत आणि युनायटेड किंगडम (UK) यांच्यात एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement - FTA) गुरुवारी स्वाक्षरी करण्यात आला. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात दरवर्षी सुमारे 34 अब्ज डॉलर्सची (सुमारे 2.85 लाख कोटी रुपये) वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हा करार भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार व उद्योग मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यात स्वाक्षरी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यात लंडनमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर या ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब झाले.
ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी या करारानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले, “भारतासोबतचा हा ऐतिहासिक करार म्हणजे ब्रिटनसाठी रोजगार, गुंतवणूक आणि विकासाचे नवे दालन. हा करार हजारो ब्रिटिश नागरिकांना रोजगार देईल, स्थानिक व्यवसायांसाठी संधी निर्माण करेल आणि सामान्य जनतेच्या खिशात अधिक पैसे टाकेल.”
द्विपक्षीय व्यापारात मोठी वाढ: व्यापारातील अडथळे दूर करून दोन्ही देशांना अधिक खुल्या बाजारपेठा.
नवीन नोकऱ्या आणि व्यवसाय संधी: विशेषतः उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात.
भारतीय कंपन्यांना युकेमध्ये प्रवेश सुलभ: भारतीय निर्यातदारांना सवलती व सुलभ व्यापार प्रक्रिया.
ब्रिटिश गुंतवणूकदारांना भारतात नवीन संधी: उत्पादन, ऑटोमोबाईल, शिक्षण, औषधनिर्माण अशा क्षेत्रांत विस्तार.
हा करार भारत-युके संबंधांमध्ये मैलाचा दगड मानला जात असून दोन्ही देशांचे परराष्ट्र धोरण, संरक्षण, ऊर्जा आणि हवामानबदल यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही सहकार्य वाढवण्याचा उद्देश आहे.
भारत आणि युकेमधील ही वाटाघाटी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या, आणि अखेर केअर स्टार्मर सरकारच्या नेतृत्वाखाली हा करार प्रत्यक्षात आला.
या ऐतिहासिक करारामुळे भारताच्या जागतिक व्यापारातील स्थान अधिक बळकट होणार असून दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना नवसंजीवनी मिळणार आहे.