Crime News
न्यूयॉर्क: अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात कौटुंबिक वादातून पतीने भारतीय पत्नीसह तिच्या तीन नातेवाईकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. अटलांटा येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयीत आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घरात गोळीबार सुरू असताना तीन लहान मुलांनी कपाटात लपून स्वतःचा जीव वाचवला.
लॉरेन्सविले शहरातील 'ब्रूक आयव्ही कोर्ट' परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय विजय कुमार याचे त्याच्या कुटुंबीयांशी काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेला आणि विजयने घरातील सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी मीमू डोग्रा (वय ४३), नातेवाईक गौरव कुमार (वय ३३), निधी चंदर (वय ३७) आणि हरीश चंदर (वय ३८) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यातील मीमू डोग्रा या भारतीय नागरिक होत्या.
गोळीबार सुरू झाला तेव्हा विजय कुमारची तीन मुले घरातच होती. घाबरलेल्या या मुलांनी प्रसंगावधान राखून स्वतःला एका कपाटात कोंडून घेतले. त्यापैकी एका मुलाने कपाटातूनच '९११' या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. मुलाने दिलेल्या माहितीमुळे पोलीस काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने, तिन्ही मुले सुरक्षित असून सध्या ती त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत.
अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने 'एक्स' वर पोस्ट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. "कौटुंबिक वादातून झालेल्या या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे," असे दूतावासाने म्हटले आहे.