ब्रिटनमधील अत्यंत गाजलेल्या आणि ऐतिहासिक ठरलेल्या या कायदेशीर लढ्यात भारतीय वंशाच्या वर्षा गोहिल (Varsha Gohil) यांनी ६.६ दशलक्ष पाउंड म्हणजेच (सुमारे ८५ कोटी रुपये) मिळवून मोठा विजय मिळवला आहे. Pudhari
आंतरराष्ट्रीय

Divorce Case | २३ वर्ष घटस्‍फोटासाठी कायदेशीर लढा, ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या महिलेला मिळाले ८५ कोटी रुपये!

पतीचे गुन्हेगारी प्रकरण उघडकीस आल्‍याने घटस्‍फोट खटल्‍यास मिळाली हो कलाटणी

पुढारी वृत्तसेवा

Varsha Gohil divorce case | गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला एक घटस्फोटाचा खटला अखेर निकाली निघाला आहे. ब्रिटनमधील अत्यंत गाजलेल्या आणि ऐतिहासिक ठरलेल्या या कायदेशीर लढ्यात भारतीय वंशाच्या वर्षा गोहिल (Varsha Gohil) यांनी ६.६ दशलक्ष पाउंड म्हणजेच (सुमारे ८५ कोटी रुपये) मिळवून मोठा विजय मिळवला आहे.

२००२ मध्ये सुरू झाला होता वाद

२००२ मध्ये वर्षा गोहिल यांनी त्यांचे पती भद्रेश गोहिल यांच्यावर विवाहबाह्य संबंध आणि जाचक वर्तनाचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्या वेळी या दाम्पत्याला तीन मुले होती.

३.५ कोटी रुपयांच्‍या 'प्युजो' कारवर तडजोडही

सुरुवातीला हा वाद सामोपचाराने मिटल्याचे दिसले होते. तेव्हा वर्षा यांनी २ लाख ७० हजार पाउंड (सुमारे ३.५ कोटी रुपये) आणि कुटुंबाची 'प्युजो' कार स्वीकारून तडजोड केली होती. परंतु, त्यांच्या पतीने आपली सर्व संपत्ती जाहीर केलेली नाही, अशी शंका वर्षा यांना पहिल्यापासूनच होती.

पतीच्‍या गुन्हेगारी प्रकरणामुळे खटल्‍यास कलाटणी

अनेक वर्षे वर्षा यांच्या शंकेला कोणताही भक्कम पुरावा नव्हता. मात्र, नायजेरियाचे माजी गव्हर्नर जेम्स इबोरी यांच्याशी संबंधित एका मोठ्या मनी लाँड्रिंग (पशांची बेकायदेशीर देवाणघेवाण) प्रकरणात भद्रेश गोहिल यांचे नाव समोर आले आणि संपूर्ण केस बदलली. भद्रेश यांनी परदेशी कंपन्या आणि क्लायंटच्या बँक खात्यांद्वारे कोट्यवधी पाउंडची हेराफेरी केल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता. प्रदीर्घ तपासानंतर, भद्रेश गोहिल यांना मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आणि २०११ मध्ये त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.या गुन्हेगारी तपासामुळे भद्रेश यांच्या अशा कोट्यवधी पाउंडच्या संपत्तीचा खुलासा झाला, जी त्यांनी घटस्फोटाच्या वेळी लपवून ठेवली होती. विविध देशांमध्ये पसरलेल्या कंपन्यांच्या जाळ्याद्वारे ही संपत्ती लपवण्यात आली होती. या नवीन पुराव्यांमुळे वर्षा गोहिल यांना त्यांच्या जुन्या तडजोडीला आव्हान देण्यासाठी नवीन बळ मिळाले.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

हे प्रकरण अखेर ब्रिटनच्‍या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचले. न्यायालयाने वर्षा गोहिल यांना जुने फायनान्शियल सेटलमेंट प्रकरण पुन्हा उघडण्याची परवानगी दिली. न्यायालयाने स्पष्ट केले की, जी व्यक्ती आपली संपत्ती पूर्णपणे जाहीर करत नाही, त्याला त्याच्या या लपवाछपवीचा फायदा मिळू दिला जाऊ शकत नाही. सरकारी वकिलांचे म्हणणे होते की, जप्त केलेली सर्व संपत्ती ही गुन्ह्यातून कमावलेली आहे. तर वर्षा गोहिल यांचा दावा होता की, या संपत्तीतील काही हिस्सा लग्नानंतर कायदेशीर व्यवसायातून उभा केला गेला होता, त्यामुळे त्यावर त्यांचा अधिकार आहे. दुसरीकडे, भद्रेश गोहिल यांनी ही संपत्ती आपली नसल्याचाच दावा केला होता.

हायकोर्टाकडून ६.६ दशलक्ष पाउंड मंजूर

अखेर हे प्रकरण हायकोर्टात गेले, जिथे न्यायमूर्ती विल्यम्स यांनी निष्कर्ष काढला की, या संपत्तीचा काही भाग कायदेशीर मार्गाने कमावलेला होता आणि तो पती-पत्नीच्या संयुक्त मालमत्तेचा भाग होता. त्यांनी ६.६६ दशलक्ष पाउंड (सुमारे ८५ कोटी रुपये) इतकी रक्कम वर्षा गोहिल यांना देण्याचे आदेश दिले.

'गोहिल' हे नाव विविध देशांतील वकील आणि न्यायाधीशांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील

निकाल देताना न्यायमूर्ती विल्यम्स म्हणाले, "पतीचे वर्तन हे प्रामाणिकपणाच्या आणि फसवणुकीच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीचे होते." 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, न्यायाधीशांनी भद्रेश गोहिल यांच्या बचावावर कडक शब्दांत टीका करत त्यांना "पूर्णपणे आणि कमालीचा लबाड" म्हटले. तसेच या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर लढ्यावर टिप्पणी करताना न्यायमूर्तींनी नमूद केले की, "हा खटला ज्या वळणावळणाने पुढे गेला, त्यावरून 'गोहिल' हे नाव विविध देशांतील वकील आणि न्यायाधीशांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील." गेल्या महिन्यात, युकेच्या कोर्ट ऑफ अपीलने या प्रकरणात पुढे कोणतीही अपील करता येणार नाही असा निर्णय दिला, ज्यामुळे २३ वर्षे चाललेल्या या प्रकरणावर अखेर पडदा पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT