Donald Trump on India Pakistan war
वॉशिंग्टन डी. सी. : पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्ष मीच थांबवला या वाक्याचा पुनरूच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गंभीर संघर्ष अणुयुद्धात रुपांतरित होऊ शकला असता, तो मी थांबवला असे ते म्हणाले.
व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मीडियाशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तान एकमेकांची लढाऊ विमाने पाडत होते. एकूण 6-7 विमाने पाडण्यात आली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की दोन्ही देश अण्वस्त्र वापरण्यासही तयार होते. मात्र, आम्ही हा संघर्ष शांततेने सोडवला.
दरम्यान, गेल्या 6 महिन्यांत 6 युद्धे थांबवली असून, भारत-पाक संघर्षही त्यापैकी एक होता, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारतावर 50 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर शुल्क) लावण्याची आणि रशियाकडून तेल आयात केल्याबद्दल अधिक दंड (penalty) आकारण्याची धमकी दिली.
त्यांचा आरोप होता की, "भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून, ते खुल्या बाजारात विकून नफा कमावत आहे. यामुळे रशियाच्या युक्रेनविरोधातील युद्धाला अप्रत्यक्षपणे मदत मिळते. 7 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लागू झाला आहे आणि 27 ऑगस्टपासून अतिरिक्त 25 टक्के दंड लागू होणार आहे.
दरम्यान, ट्रम्प आज शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत चर्चा करणार आहेत. त्यांनी याचाही उल्लेख आपल्या भाषणात केला.
भारतीय वायुदलाचा दावा – ऑपरेशन ‘सिंदूर’मध्ये पाकिस्तानची 5 विमाने पाडली..
9 ऑगस्ट रोजी एअरफोर्स चीफ ए. पी. सिंह यांनी बेंगळुरूमधील एका कार्यक्रमात सांगितले की, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानची 5 लढाऊ विमाने आणि 1 सर्व्हेलन्स विमान पाडले. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आणि पाकिस्तान भारतीय हवाई संरक्षणात घुसू शकला नाही.
पाकिस्तानचा दावा – भारताची 6 लढाऊ विमाने पाडली
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या संसदेत सांगितले की भारताने 7 मे रोजी पाकिस्तानी दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानने प्रत्युत्तरात भारताची 5 विमाने (त्यात 3 राफेल) पाडली. नंतर हा आकडा वाढवत 6 विमाने असा दावा करण्यात आला.
पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते शफकत अली खान यांनी भारताला "कल्पनाविलास करू नका, वास्तव स्वीकारा" असेही म्हटले.
भारताचे CDS अनिल चौहान यांनी मे महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, विमान किती पाडली गेली हे महत्त्वाचे नाही, तर ती का पाडली गेली आणि त्यातून काय शिकलो, हे महत्त्वाचे आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारताने आपली चूक ओळखली, सुधारली आणि दोन दिवसांतच पाकिस्तानवर अचूक हल्ला केला.
तसेच, त्यांनी ट्रम्प यांचा "अणुयुद्ध होऊ शकले असते" असा दावा फेटाळला आणि सांगितले की "कधीही अण्वस्त्र वापरण्याची वेळ आलीच नाही", ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे.
7 मे रोजी रात्री दीड वाजता, भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
लष्कराच्या माहितीनुसार, या स्ट्राइकमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. हे हल्ले कोटली, बहावलपूर, मुरीदके, बाग आणि मुजफ्फराबाद येथे झाले. यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांचे तळ नष्ट करण्यात आले.