

Bitcoin all-time high crosses Rs. 1 crore
मुंबई : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने आज पहिल्यांदाच 1.08 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 2009 मध्ये जवळजवळ शून्य किंमतीपासून सुरू झालेला बिटकॉईनचा प्रवास आज डिजिटल संपत्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. या एका वर्षातच बिटकॉइनची किंमत सुमारे 57 लाख रुपयांनी वाढली आहे. एकंदरीत 2009 मध्ये 1 रुपयाचाही गुंतवणूक केली असती, तर आज 1 कोटी रुपयांच्या वर किंमत मिळाली असती.
बिटकॉईनची सुरुवात 2009 मध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या गूढ व्यक्तीने केली होती. त्यावेळी त्याचे बाजारमूल्य शून्याच्या जवळ होते. 2010 मध्ये बिटकॉईनची किंमत प्रथमच $0.10 (8 रुपये) झाली. पुढील काही वर्षांत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 2013 मध्ये ही किंमत $1000 (सुमारे 87,000 रुपये) झाली आणि आज 2025 मध्ये ती 1.08 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
अमेरिकन धोरणात बदल: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोला अनुकूल धोरणं राबवली. बँकांना क्रिप्टो कंपन्यांसोबत व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली.
संस्थात्मक गुंतवणूक वाढली: मोठ्या गुंतवणूकदारांनी बिटकॉईन ETF मध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली.
जगभरात स्वीकार: लंडन, थायलंडसारख्या बाजारांमध्ये क्रिप्टो ETF ला मंजुरी मिळाल्याने जागतिक स्वीकार वाढला.
बिटकॉईन हे डिजिटल चलन आहे, ज्यावर कोणत्याही सरकार, बँक किंवा संस्थेचा ताबा नसतो. याला "डिसेंट्रलाईज्ड" चलन म्हटले जाते. हे केवळ डिजिटल स्वरूपात असते आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असते.
ब्लॉकचेन म्हणजे एक सार्वजनिक डिजिटल वहिखाते. ज्यामध्ये प्रत्येक बिटकॉईन व्यवहाराची नोंद असते. हा डेटा हजारो संगणकांवर वितरित असतो. त्यामुळे तो कुणीही बदलू शकत नाही आणि तो सुरक्षित राहतो. माइनर्स नावाचे लोक संगणक वापरून क्लिष्ट गणिती प्रश्न सोडवतात आणि याबदल्यात त्यांना नवीन बिटकॉईन मिळतात.
बिटकॉईनची एकूण मर्यादा फक्त 21 दशलक्ष (21 मिलियन) आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा मर्यादित आहे आणि यामुळे त्याची किंमत वाढते. याच कारणामुळे त्याला डिजिटल सोनं म्हणतात. सोनं दुर्मिळ आणि मौल्यवान आहे.
बिटकॉईन हे सरकार किंवा बँकेच्या नियंत्रणापासून मुक्त असते. वेगवान आणि कमी खर्चिक असल्याने जागतिक व्यवहारांमध्ये उपयोगी पडते. ब्लॉकचेनद्वारे पारदर्शकता जोपासली जात असल्याने व्यवहार सुरक्षित असतात हे याचे फायदे आहेत.
तर एकाच दिवशी किंमतीत कमीजास्त असा मोठा फरक पडत असल्याने किंमत अनिश्चित्त असते. माइनिंगसाठी प्रचंड वीज लागते, असे सांगितले जाते. मनी लाँड्रिंग आणि शस्रास्त्रखरेदीसाठी याचा वापर केला जातो.
जर कंपन्या व सामान्य लोक बिटकॉईनचा वापर करू लागले, तर याचे मूल्य आणखी वाढू शकते. भविष्यात बिटकॉईनचे स्थान सरकारच्या नियमांवरही अवलंबून असेल. व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे.
बिटकॉईनने डिजिटल चलनाचं भविष्य बदललं आहे. यामध्ये मोठा नफा मिळू शकतो, पण जोखमीही मोठ्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे.