पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भेदरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ ( Pakistan PMinister Shehbaz Sharif ) यांनी भारताविराेधात अनेक वल्गना केल्या. आम्ही युद्धासाठी तयार आहोत, अशी पोकळ धमकीही त्यांनी वारंवार दिला. मात्र आता त्यांची युद्धाची 'नशा' उतरल्याचे दिसत आहे. तेहरान दौर्यावर शरीफ यांनी तेहरानच्या भेटीदरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी काश्मीर, दहशतवाद, पाणी वाटप आणि व्यापार यासह प्रमुख द्विपक्षीय मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारताशी शांतता चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी होणारी कोणतीही चर्चा पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यापुरती आणि दहशतवादाच्या मुद्द्यापुरती मर्यादित असेल.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. ते २५ ते ३० मे २०२५ दरम्यान तुर्की, इराण, अझरबैजान आणि ताजिकिस्तानला भेट देतील. तेहरान येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरीफ म्हणाले की, आम्ही काश्मीर आणि पाण्याच्या मुद्द्यावर बोलण्यास तयार आहेत. दहशतवाद आणि व्यापार या विषयांवरही चर्चा होऊ शकते. आम्हाला काश्मीर मुद्दा आणि पाणी प्रश्नासह सर्व वाद वाटाघाटीद्वारे सोडवायचे आहेत, व्यापार आणि दहशतवादविरोधी मुद्द्यांवर आमच्या शेजाऱ्याशी बोलण्यासही तयार आहोत, असे सांगताना भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तान जिंकला, असा दावा करत भारताने आक्रमक भूमिका घेतली तर त्यांना कसे प्रत्युत्तर द्यायचे हे देखील माहित आहे, अशी वल्गनाही त्यांनी केली.
पाकिस्तानबरोबर यापुढे चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यापुरती आणि दहशतवादाच्या मुद्द्यापुरती मर्यादीत असेल, असे भारताने स्पष्ट केले आहे. "काश्मीरवर आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आता फक्त एकच मुद्दा शिल्लक आहे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत मिळवणे. यावर बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. दहशतवाद्यांना ताब्यात देण्याबद्दल बोलत असतील तर आम्ही बोलू शकतो. आमचा इतर कोणत्याही विषयावर विचार नाही," असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिलाहोता. भारत आणि पाकिस्तानमधील कोणतीही चर्चा द्विपक्षीय बाब राहिली पाहिजे, ज्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा सहभाग नसेल, असेही भारताने स्पष्ट केले आहे.