इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरूंगात हत्या झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. त्यांच्या जखमी होण्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत.
या धक्कादायक घटनेच्या दाव्याने पाकिस्तानात खळबळ उडाली. दरम्यान, पाकिस्तान सरकारने एक निवेदन जारी करून इम्रान खान यांच्या हत्येबाबात खुलासा केला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका तारीख नसलेल्या निवेदनात शनिवारी (दि.१०) दावा करण्यात आला होता की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे न्यायालयीन कोठडीत निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी सुरू आहे. हे बनावट पत्र वाऱ्यासारखे सोशल मीडियावर पसरले. या फेक वृत्तामुळे पाकिस्तानसह जगभरात खळबळ उडाली.
दरम्यान पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी (दि.१०) तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूची घोषणा करणारे प्रेसनोट “बनावट” असल्याचे म्हटले. तसेच जनतेला “बेजबाबदार वर्तन नाकारण्याचे आवाहन देखील केले. तसेच सरकार परिस्थितीचे गांभीर्य ओळखते आणि घटनेची कारणे निश्चित करण्यासाठी आणि जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहे, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाने खान पक्षाच्या संस्थापकाच्या सुटकेसाठी शुक्रवारी (दि.९) इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. पक्षाने खान यांच्या आरोग्यावर दीर्घकाळाच्या तुरुंगवासाचा परिणाम आणि भारतासोबतच्या सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. "इमरान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री केपी अली अमीन यांनी अर्ज दाखल केला आहे. भारतासोबतच्या सध्याच्या युद्ध परिस्थिती, राष्ट्रीय सौहार्द आणि एकता लक्षात घेता आणि अदियाला तुरुंगात ड्रोन हल्ल्याच्या भीतीमुळे त्यांना तात्काळ पॅरोल/प्रोबेशनवर सोडण्याची विनंती करण्यात आली आहे," असे पक्षाने म्हटले आहे.