

पाकिस्तानात आजपावेतो मुख्य सत्तासूत्रे लष्कराच्याच हाती आहेत. इम्रान खान यांनाही लष्करानेच पंतप्रधान केले होते. परंतु; आता इम्रान खान आणि लष्कर (Imran Khan and Army conflict) यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. इम्रान यांना पदावरून हटवून पुन्हा नवाझ शरीफ यांना त्यांच्या जागी बसविण्याचे प्रयत्न सुरू झालेे आहेत.
पाकिस्तानची सत्तासूत्रे सांभाळल्यापासून पंतप्रधान इम्रान खान सातत्याने समस्येच्या गर्तेत आहेत. त्यांच्यावरील असुरक्षिततेचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. वास्तविक पाहता, इम्रान खान यांना पाकिस्तानच्या लष्करानेच कठपुतली बनवून पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसवले होते. त्या काळामध्ये नवाझ शरीफ यांची निवडून येण्याची शक्यता खूप अधिक होती; पण भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली दोषी ठरवून त्यांना तुरुंगात पाठवले आणि इम्रान खान यांचा मार्ग मोकळा केला होता.
पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संबंध बराच काळ सुरळीत होते. परंतु; इम्रान खान यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांचा सामना करावाच लागला. कारण, पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची ढासळली होती.
आजघडीला पाकिस्तानात गरिबीचा आणि बेरोजगारीचा आकडा न 'भूतो न भविष्यति' इतका प्रचंड वाढला आहे. हा देश आज आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अर्थात, यापूर्वीदेखील पाकिस्तान अशा प्रकारे भिकेकंगाल झाला होता; पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांनी अनेकदा आर्थिक मदत देऊन पाकिस्तानला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढले. परंतु; यावेळी परिस्थिती फार भीषण आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले. परिणामी, आजवर सौदी अरेबियाकडून दिली जाणारी भरीव आर्थिक मदत मिळणे दुरापास्त झाले. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानबाबत अत्यंत कडक धोरण स्वीकारले. जो बायडेन यांचीही भूमिका ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानविषयी पूर्वीइतके ममत्व नसणारी आहे.
त्यामुळे इम्रान खान यांना अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवताना अडचणी येत गेल्या. तशातच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये येणारी विदेशी गुंतवणूक कमालीची कमी होत गेली. बहुराष्ट्रीय कंपन्या पाकिस्तानात गुंतवणूक करण्यास, व्यवसाय करण्यास तयार नाहीत. या सर्वांचा प्रतिकूल परिणाम पाकिस्तानी नागरिकांच्या जीवनस्तरावर झाला. (Imran Khan and Army conflict)
प्रदीर्घ काळ लोकांना बेरोजगारी, गरिबीचा सामना करावा लागल्याने याचे पडसाद तीव्र आंदोलनाच्या रूपाने समोर येऊ लागले. तथापि, इम्रान खान यांना सातत्याने पाकिस्तानचा सदासर्वकाळ मित्र असलेला चीन वाचवत गेला. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनने सुमारे 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.
चीनची ही गुंतवणूक कर्जाऊ आहे. आज ना उद्या हा पैसा पाकिस्तानला चीनला परत करावा लागणार आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्यावर त्यांनी पाकिस्तान चीनला अक्षरशः विकल्याचे, पाकिस्तान हा चीनचा गुलाम झाल्याचेही आरोप झाले. चीन हा वसाहतवादी देश असून, पाकिस्तान हा चीनची वसाहत बनल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचाही रोष इम्रान खान यांना पत्करावा लागत आहे.
इम्रान खान यांना ज्यांनी सत्तेवर बसवले आणि जनतेच्या क्षोभापासून त्यांनी ज्यांनी सदैव पाठीशी घालत बचाव केला, त्या पाकिस्तानी लष्करासोबतच इम्रान यांचा संघर्ष सुरू झाला आहे. हा वाद इतका पराकोटीला गेला आहे की, नुकतेच पाकिस्तानी लष्कराने थेट माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा सुरू केली! शरीफ यांना पुन्हा पाकिस्तानात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. थोडक्यात, इम्रान खान यांना पर्याय म्हणून पाकिस्तानी लष्कर आता शरीफांकडे पाहात आहे. अर्थातच ही इम्रान खान यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
वाद का निर्माण झाला? (Imran Khan and Army conflict)
काही दिवसांपूर्वी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावर कोणाची नियुक्ती करायची, यावरून इम्रान विरुद्ध लष्कर असा संघर्ष उद्भवला. 20 नोव्हेंबरपर्यंत आयएसआयच्या प्रमुखपदी फईज अहमद हे कार्यरत होते. त्यांचे इम्रान खान यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले.
याच फईज यांना आयएसआयच्या प्रमुखपदी काही काळ ठेवावे, असे इम्रान खान यांचे म्हणणे होते. परंतु; पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा त्याला विरोध आहे. कारण, फईज यांनी मुलाखतीतून तालिबान, हक्कानी यांना उघडपणे समर्थन दर्शविले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तानात तालिबानचे शासन प्रस्थापित होण्यामध्ये फईज यांची मोलाची भूमिका राहिली आहे.
या काळात फईज अफगाणिस्तानात तळ ठोकून होते. तालिबानचे मंत्रिमंडळ निवडण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु; या मंत्रिमंडळात 17 जण आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत. तालिबान हे पाकिस्ताननेच जन्माला घातलेले, वाढवलेले अपत्य असले तरी आजवर सार्वजनिकरीत्या बोलताना पाकिस्तान नेहमीच तालिबानशी संबंध नाकारत राहिला.
परंतु; फईज यांनी उघड मुलाखतींमधून पाकिस्तान तालिबानला कशा पद्धतीने मदत करत आहे, हेदेखील स्पष्ट केले. परिणामी, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्करावर पुन्हा जगभरात टीका होऊ लागली. त्यामुळेच बाजवा यांना फईज नकोसे झाले. त्यांच्याऐवजी दुसर्या व्यक्तीची वर्णी लावण्याचा बाजवांचा विचार होता. यातून इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात ठिणगी पडली.
स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानात आजही अंतिम निर्णय लष्कराचाच असल्याने तेथे लष्कराच्या मर्जीतल्या व्यक्तीचीच पंतप्रधानपदी निवड केली जाते. त्यातूनही जर कोणी लष्कराच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला तुरुंगात जावे लागले आहे, देश सोडून जावे लागले आहे. नवाझ शरीफ यांच्याबाबत हेच घडले होते. लष्कराशी असणारा संघर्ष शरीफ यांना महागात पडला होता. त्यांना देश सोडून जावे लागले होते; पण आता पुन्हा लष्कराकडून त्यांंना पाकिस्तानात आणण्याचा डाव रचला जात आहे.
थोडक्यात, नवाझ शरीफ असोत किंवा इम्रान खान; हे सर्व लष्कराच्या हातातील बाहुले आहेत. अशा परिस्थितीत आता इम्रान खान यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपला पारंपरिक मित्र असलेल्या सौदी अरेबियापुढे गुडघे टेकले आहेत. त्यांनी सौदीकडे तीन अब्ज डॉलर्सची मदत मागितली आहे. ती न मिळाल्यास पाकिस्तान दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. या दिवाळखोर परिस्थितीमुळे इम्रान खान यांची खुर्ची सध्या धोक्यात आली आहे.
– डॉ. शैलैंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक