US Strikes Venezuela file photo
आंतरराष्ट्रीय

US Strikes Venezuela: अमेरिकेने वेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कसं पकडलं?

Venezuela President Maduro captured: अमेरिकेने व्हेनेझुएलावर क्षेपणास्त्र हल्ला करून अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पत्नीसह अटक केली. अमेरिकेच्या या अत्यंत धाडसी ऑपरेशनची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती.

मोहन कारंडे

Venezuela President Maduro captured

वॉशिंग्टन: अमेरिकेने शुक्रवारी रातोरात व्हेनेझुएलावर क्षेपणास्त्र हल्ला केला. तसेच, तेथे दीर्घकाळ सत्तेत असलेले अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पत्नीसह अटक केली. हल्ल्यादरम्यान अमेरिकेने नागरी, तसेच लष्करी ठिकाणेही लक्ष्य केली. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या या अत्यंत धाडसी ऑपरेशनची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती.

'डेल्टा फोर्स'ची एलीट मोहीम आणि सराव

वेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याबद्दल जग अजून समजून घेण्याचा प्रयत्नच करत होते, इतक्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिकन लष्कराच्या एका धाडसी मोहिमेत वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या एलीट डेल्टा फोर्सने ही मोहीम राबवली. यासाठी अतिशय सविस्तर सराव करण्यात आला होता. अमेरिकन सैनिकांनी मादुरो यांच्या 'सेफ हाऊस'ची हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. कडेकोट सुरक्षा असलेल्या या ठिकाणी नेमके कसे घुसायचे, याचा सराव या प्रतिकृतीच्या आधारे करण्यात आला होता.

मादुरोच्या जवळ होता CIA एजंट

रॉयटर्सने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ची एक छोटी टीम ऑगस्टपासूनच वेनेझुएलामध्ये सक्रिय होती. या टीमने मादुरो यांच्या दैनिक घडामोडींची इत्थंभूत माहिती गोळा केली, ज्यामुळे त्यांना पकडणे सोपे झाले. अन्य दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर संस्थेचा एक एजंट मादुरो यांच्या अगदी जवळ होता, जो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता आणि ऑपरेशन सुरू झाल्यावर त्यांचे अचूक लोकेशन सांगत होता.

चार दिवसांपूर्वीच होणार होते ऑपरेशन

सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चार दिवसांपूर्वीच या ऑपरेशनला मंजुरी दिली होती. मात्र, लष्करातील अधिकाऱ्यांनी खराब हवामान असल्याने ते रोखण्याचा आणि चांगल्या हवामानाची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर अमेरिकन वेळेनुसार शुक्रवारी रात्री १०:४६ वाजता ट्रम्प यांनी या मोहिमेला परवानगी दिली, ज्याला 'ऑपरेशन एब्सोल्यूट रिझॉल्व्ह' असे नाव देण्यात आले.

ट्रम्प पाहत होते 'लाईव्ह' थरार

ट्रम्प यांनी सांगितले की, ते फ्लोरिडातील पाम बीच येथील त्यांच्या 'मार-ए-लागो' क्लबमधून आपल्या सल्लागारांसह या ऑपरेशनचे थेट प्रक्षेपण पाहत होते. मोहीम फत्ते झाल्यानंतर ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले, "मी आतापर्यंत अनेक उत्तम कामे केली आहेत, पण असे काही मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते."

अमेरिकेने कशी केली होती तयारी?

अमेरिकेने या ऑपरेशनसाठी जय्यत तयारी केली होती. यासाठी कॅरिबियन समुद्रात एक विमानवाहू युद्धनौका, ११ युद्धनौका आणि डझनहून अधिक F-35 लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती. या मोहिमेच्या बरेच आधीपासून या भागात १५,००० पेक्षा जास्त सैनिक तैनात होते. मात्र, ही तैनाती अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा भाग असल्याचे भासवले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT