

Pakistan Back China Mediation Claim: पाकिस्तानने यापूर्वी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर ऑपरेशन सिंदूर थांबलं या ट्रम्प यांच्या दाव्याला जाहीर दुजोरा दिला होता. फक्त दुजोरा दिला नाही तर ट्रम्प यांना यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात यावं अशी मागणी देखील पाकिस्ताननं केली होती. पाकिस्तान अमेरिका अन् ट्रम्प यांना खुष करण्यासाठी प्रयत्न करत होता.
मात्र आता पाकिस्तानने कोलांटी उडी मारली असून आता अमेरिकेचा एक नंबरचा दुष्मन देश चीनच्या दाव्याला देखील दुजोरा दिला आहे. चीनने नुकतेच दावा केला होता की मे २०२५ मध्ये भारत - पाकिस्तान यांच्यात झालेल्या सैन्य संघर्षावेळी त्यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली होती.
चीनच्या या दाव्यानंतर पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते ताहीर अंद्राबी यांनी सांगितलं की चीनचे नेते पाकिस्तान नेतृत्वाच्या सतत संपर्कात होतो. त्यांनी भारतीय नेत्यांसोबत देखील संपर्क साधला होता. त्या तीन चार दिवसात त्यापूर्वी आणि त्यानंतरही ते संपर्कात होतो.
ताहीर पुढे म्हणाले, 'त्यामुळं मला वाटतं की चीन बरोबर बोलत आहे. यामुळे एक सकारात्मक राजनैतिक व्यवहाराचे दर्शन होते. त्यांनी तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी आणि भागात शांतता अन् सुरक्षा प्रस्थापित होण्यासाठी योगदान दिलं. त्यामुळं मला खात्री आहे की चीनची मध्यस्थाची भूमिका योग्य होती.'
पाकिस्तानच्या या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनची काही भूमिका होती हे अधिकृतरित्या अधोरेखित झालं आहे. मात्र त्यामुळं सर्वांनीच भूवया उंचावल्या आहेत. कारण पाकिस्ताननं यापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या मध्यस्थीचं सर्व क्रेडिट हे डोनाल्ट ट्रम्प यांना दिलं होतं.
भारतानं ज्यावेळी पाकिस्तानच्या DGMO यांनी आता 'बस करा जनाब' अशी विनवणी केल्यानंतरच ऑपरेशन सिंदूर स्थगित केल्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे. भारतानं तिसऱ्या कोणत्याही पार्टीच्या मध्यस्थीचा दावा स्विकारलेला नाही. भारताने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा चीनने मध्यस्थी केली होती हा दावा देखील नाकारला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या ताहीर यांनी चीनने हे राजनैतिक प्रयत्न शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी केल्याचं म्हटलं आहे. तीन चार दिवसाच्या या संघर्षादरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरून अनेक प्रयत्न झाल्याचं हे प्रतिक आहे असं देखील मत पाकिस्ताननं व्यक्त केलं आहे. पाकिस्तानने चीनच्या भूमिकेला पाठिंबा देत आहोत असं देखील म्हटलं आहे.
चीनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्यांनी दोन अण्विक देशांमधील सैन्य संघर्ष थांबावण्यासाठी प्रयत्न केल्याच्या दाव्याची कॉपी केली आहे.