कीर स्टार्मर यांनी निवडणुकीपूर्वी किंग्सबरी येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली होती.  file photo
आंतरराष्ट्रीय

UK general election | 'ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला जागा नाही' म्हणत कीर स्टार्मर यांनी हिंदूंची मते कशी मिळवली?

लेबर पार्टीची भूमिका बदलण्यात स्टार्मर ठरले यशस्वी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

ब्रिटनमध्ये चौदा वर्षानंतर सत्तापरिवर्तन झाले आहे. ब्रिटनमधील निवडणुकीत (UK general election) मूळ भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनाक (Rishi Sunak) यांच्या नेतृत्त्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या नेतृत्त्वाखालील लेबर पार्टीने दारुण पराभव केला. ब्रिटन संसदेच्या ६५० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत लेबर पार्टीने ४१२ जागा जिंकल्या. तर कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ १२१ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे कीर स्टार्मर (वय ६१) हे ब्रिटनचे ५८ वे पंतप्रधान बनले आहेत.

ठळक मुद्दे

  • ब्रिटनचे नवे पंतप्रधान यांच्या विजयात हिंदू मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरली.

  • ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला स्थान नाही, असे कीर स्टार्मर म्हणाले होते.

  • कीर स्टार्मर यांनी लेबर पार्टीची हिंदूविरोधी भूमिका बदलली

  • समृद्ध हिंदू वारसा आणि ब्रिटनच्या भविष्याप्रती असलेल्या मजबूत बांधिलकीबद्दल त्यांनी ब्रिटनमधील हिंदूंचे कौतुक केले होते.

लेबर पार्टीची भूमिका बदलण्यात स्टार्मर ठरले यशस्वी

लेबर पार्टीची भूमिका नेहमीच भारत विरोधी आणि हिंदू विरोधी अशीच पाहिली गेली. पण यावेळी लेबर पार्टीची भूमिका बदलण्यात कीर स्टार्मर यशस्वी ठरले. त्यामुळेच त्यांना ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंची मते मिळाली आणि ते जिंकल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

हिंदूविरोधी भूमिका

द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला (Hinduphobia in Britain) स्थान नाही, असे कीर स्टार्मर यांनी म्हटले होते. स्टार्मर यांना जाणीव झाली की त्यांना जिंकण्यासाठी लेबर पार्टीला तत्कालीन नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या काळातील पक्षाची भूमिका बदलावी लागेल. जिथे त्यांची भूमिका हिंदू, ज्यू, गोरे लोक आणि कामगार वर्गातील लोकांसह विविध गटांना वेगळे करण्याची होती. २०१९ मध्ये लेबर पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. कॉर्बिन यांच्या कार्यकाळात एक समुह खूप नाराज होता, तो म्हणजे ब्रिटिश हिंदू होता. जो लेबर पार्टीचे पारंपारिक मतदारही होता. जेरेमी कॉर्बिन यांच्या काळात लेबर पार्टीची प्रतिमा हिंदूविरोधी बनली होती.

काश्मीर प्रश्नी तोंड घातले अन्

कॉर्बिन यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत "प्रदेशात मानवतावादी संकट" असल्याचे घोषित करणारा प्रस्ताव पारित केला आणि "काश्मीरच्या लोकांना आत्मनिर्णयाचा अधिकार आहे" असे प्रतिपादन केले. पण कॉर्बिन यांनी लगेच यावर स्पष्टीकरण दिले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लेबर पार्टीकडे नेहमीच भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक पार्टी म्हणून पाहिले गेले.

ब्रिटनमध्ये हिंदू मतदार का आहे महत्त्वाचा?

२०२१ च्या जनगणेनुसार, ब्रिटनमध्ये १८ लाख ब्रिटिश भारतीय आहेत. त्यात जवळपास १० लाख हिंदूंचा समावेश आहे. ब्रिटिश हिंदूंनी इंडियन व्होट्स मॅटर नावाचा एक गट तयार केला, ज्यांनी लेबर पार्टीच्या 'भारतविरोधी' आणि 'हिंदू विरोधी' भूमिकेविरुद्ध प्रचार केला. पण कीर स्टार्मर यांनी जेरेमी कॉर्बिन यांची जागा घेतल्यानंतर त्यांनी भारतीय ब्रिटिश आणि हिंदूंशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली. त्यांनी लेबर फ्रेंड्स ऑफ इंडियाच्या एका बैठकीत म्हटले होते, 'भारतातील कोणताही घटनात्मक मुद्दा हा भारतीय संसदेचा विषय आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा आहे. जो शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे.'

कीर स्टार्मर यांच्या किंग्सबरी येथील श्री स्वामीनारायण मंदिरातील भेटीचा एक क्षण.

भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न

स्टार्मर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर जोर दिला. लेबर पार्टीने २०२४ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतासोबतच्या नवीन धोरणात्मक भागीदारीचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये मुक्त व्यापार करार तसेच सुरक्षा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि हवामान बदल यासारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवणे आदींचा समावेश आहे. स्टार्मर यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये खुलासा केला होती की, आता लेबर पार्टी बदलली आहे. माझे लेबर सरकार लोकशाही आणि आकांक्षेच्या आमच्या सामायिक मूल्यांवर आधारित भारताशी संबंध मजबूत करेल.

किंग्सबरी येथील श्री स्वामीनारायण मंदिरात कीर स्टार्मर प्रार्थना करताना.

स्टार्मर हिंदूबद्दल काय म्हणाले होते?

लेबर पार्टीची हिंदूविरोधी भूमिका बदलण्यासाठी स्टार्मर यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी निवडणुकीपूर्वी किंग्सबरी येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती. ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला कोणतेही स्थान नाही आणि लेबर पार्टी भारतासोबत नवीन धोरणात्मक भागीदारी करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले होते. या ठिकाणी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जय स्वामीनारायण असा जयघोष करत केली होती. त्यांनी समृद्ध हिंदू वारसा आणि ब्रिटनच्या भविष्याप्रती असलेल्या मजबूत बांधिलकीबद्दल त्यांचे कौतुक केले होते. 'निवडून आल्यास आम्ही आमचे सरकार सेवा भावनेने, हिंदू मूल्यांच्या मजबूत आधारावर चालवू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. तुम्ही केवळ आमच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत नाही, तर तुम्ही नाविन्य आणि कौशल्यदेखील आणत आहात, असेही ते म्हणाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT