प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Hilsa Fish : गुजरातचे मासे खवय्यांच्या परीक्षेत 'नापास', बांगलादेश सरकारची आयातबंदी

हिल्सा बेकायदेशीर मार्गांनी बाजारात येतच असल्‍याचा 'बांगलादेश मरीन'चा दावा

पुढारी वृत्तसेवा

बांगलादेशात विकला गेलेला गुजरातचा हिल्सा मासा चवीच्या परीक्षेत अपयशी ठरला आहे. तसेच बांगलादेशनचे त्‍याच्‍या आयातवरही बंदी घातली आहे.

Gujarat Hilsa Fish Bangladesh : मासे खाण्याची आवड असणारा माणूस त्याची चव अचूक ओळखतो. चांगल्या चवीचा मासा मिळणार असेल, तर दोन पैसे जास्त मोजायलाही खवय्ये मागेपुढे पाहत नाहीत; पण याच आवडीच्या माशाची चव बिघडली तर होणारा हिरमोड संपूर्ण जेवणाचा बट्ट्याबोळ करतो. गुजरातहून बांगलादेशात पोहोचलेल्या 'हिल्सा' माशाबाबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. बांगलादेशमधील खवय्‍यांच्‍या चवीत गुजराती हिल्‍सा मासा फेल झाल्‍याचे चित्र आहे.

हंगामातील पहिल्‍याच हिल्‍सा खरेदीत हिरमोड

'द प्रिंट'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, बांगलादेशमधील स्‍थानिक बाजारात एका ग्राहकाने प्रत्येकी १,२०० टाका (बांगलादेशी चलन) दराने ८०० ग्रॅम वजनाचे दोन मासे विकत घेतले. या हंगामातील त्यांची ही पहिलीच हिल्सा खरेदी होती. आवडत्या माशाचा आस्वाद घेण्याची कल्पना करत होते; पण जेव्हा त्याचे तुकडे गरम मोहरीच्या तेलात तळले गेले, तेव्हा ते तुटले. चंद्रा यांना आश्चर्य वाटले. "तो गुजरातचा हिल्सा होता की जुना मासा? त्याची चव बांगलादेशी 'इलिश'सारखी (हिल्सासारखी) नव्हती," असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, बुधवारी (२३ सप्टेंबर) बांगलादेशने भारतातील हिल्सा आयात थांबवल्‍याचे जाहीर केले. आयातदारांना दिलेली १०३ 'ना-हरकत प्रमाणपत्रे' रद्द केली आहेत.

गुजरातमधून हिल्‍सा मासा बांगलादेशात...

मागील काही महिन्यांत गुजरातच्या नर्मदा भागातून मोठ्या प्रमणात हिल्सा मासा बांगलादेशात आला होता. येथील काही व्यापाऱ्यांनी कथितरीत्या याची 'पद्मा हिल्सा' म्हणून विक्रीही केली. दरम्‍यान, बुधवारी (२३ सप्टेंबर) बांगलादेशने भारतातील हिल्सा आयात थांबवल्‍याचे जाहीर केले. आयातदारांना दिलेली १०३ 'ना-हरकत प्रमाणपत्रे' (NOCs) रद्द केली. एका रिपोर्टनुसार, २० जुलै ते २० सप्टेंबर या काळात बेनापोलमार्गे ५५३ टन हिल्‍सा मासा गुजरातमधून बांगलादेशात पोहचला. बांगलादेशातील लोक गुजरातचा हिल्सा विकत घेत होते कारण विक्रेत्यांनी अफवा पसरवली होती की हे 'पद्मा हिल्सा' आहेत.

गुजराती हिल्‍सा आणि बांगलादेशी हिल्‍साच्‍या चवीत प्रचंड तफावत

"गुजरातमधील हिल्‍सा मासा हा स्वस्त आणि आकाराने मोठा असतो; पण चवीच्या बाबतीत बांगलादेशी हिल्साच्या आसपासही पोहोचू शकत नाही," चांदपूरचे रहिवासी आलमगीर पटवारी हे देखील काही दिवसांपूर्वी 'इलिश' (हिल्सा) मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. विक्रेत्याने जेव्हा तो मासा बांगलादेशी हिल्सा असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांना त्यातील फरक लगेचच जाणवला. "गुजरातच्या हिल्‍सा माशांकडे पाहिल्यावर ते समुद्रातून आल्यासारखे वाटतात. त्यात ती विशिष्ट गोडी नसते."

'गुजरातचे हिल्‍सा मासे बेकायदेशीर मार्गांनी बांगलादेशात'

बांगलादेशने आयात थांबवलेली असतानाही, 'बांगलादेश मरीन फिशरी असोसिएशन'ने (BMFA) असा दावा केला की, गुजरातचे हिल्‍सा मासे बेकायदेशीर मार्गांनी बाजारात येतच राहिले. BMFA चे सचिव शेख आबिद हुसेन म्हणाले, "बुधवारी, सुंदरबन सीमा भागातून सुमारे ७५ टन मासे किनाऱ्यावर पोहोचले." हुसेन हे ढाकामध्ये हिल्सा मासे खरेदी करायला गेले, त्‍यावेळी त्यांनाही बाजारात गुजरातचे मासे दिसले. ते म्हणाले, "सामान्य माणसाला कदाचित पहिल्या नजरेत यात काही फरक दिसणार नाही, पण आम्हाला तो फरक ओळखता येतो."

बांगलादेशमधील शहरातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्री

गुजरातचे हिल्सा मासे बाजारात नेमके कधीपासून दिसू लागले, याबाबत स्‍पष्‍टता नाही. मात्र, ढाका येथील एका मासा विक्रेत्‍याने सांगितले की, शहरातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये हे मासे आढळले. बांगलादेशात गुजरातचे हिल्सा मासे विकले जात असल्याच्या बातम्या पसरताच, ग्राहकांनी आपण नक्की काय खरेदी करत होतो, याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्‍यांनतर माशाच्‍या चवीत का फरक पडला याचे कारणही स्‍पष्‍ट झाले.

गुणवत्तेबाबत ग्राहकांच्‍या पदरी निराशाच

ग्राहक चंद्रा यांच्‍या मते , "त्या माशांपासून आम्ही हिल्सा करी (रस्सा भाजी) कधीच बनवू शकलो नसतो." त्याऐवजी त्यांच्या कुटुंबाने 'हिल्सा भर्ता' तयार केला. गुणवत्तेबाबत चंद्रा यांना निराशाच पदरी पडली. त्यांना दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातील चांदपूरच्या हिल्सा माशांचा दर प्रति किलो सुमारे २,००० टाका (बांगलादेशी चलन) इतका होता. त्या माशांसाठी अतिरिक्त तेलाची गरज लागत नसे. एकदा का ते गरम तेलात तळले गेले, की हिल्सा शिजत असल्याचा सुवास संपूर्ण परिसरात दरवळायचा." नर्मदा नदीतील हिल्सा मासे त्यांच्या ताटात ती जादू निर्माण करू शकले नाहीत. गुजरातच्या हिल्सा माशांनी व्यापाऱ्यांचेही मन जिंकले नाही.

व्यापाऱ्यांनी मासा खरेदीसाठी गुजरातकडे मोर्चा का वळवला?

बांगलादेशातील स्थानिक हिल्सा माशांची पकड (उत्पादन) कमी होत असल्याने, स्वस्त मासे आणि थोडा नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यापाऱ्यांनी गुजरातकडे आपला मोर्चा वळवला होता. ढाक्यातील सर्वात मोठ्या घाऊक विक्रेत्यांपैकी एक असलेल्या 'दास' यांनी इतर अनेक व्यापाऱ्यांप्रमाणे 'गुजरात हिल्सा'ची विक्री सुरू केली नाही; , त्यांनी बांगलादेशी हिल्साचीच विक्री चालू ठेवली.

गुजरातमधील हिल्सा मोठ्या प्रमाणावर बांगलादेशत दाखल होण्याची पहिली वेळ

"गुजरात हिल्सा १,२०० टाका प्रति किलो दराने विकली जात होती. त्यात २५० टाका प्रति किलो कर आणि इतर शुल्कांचा भार असल्याने, दुकानदारांच्या हाती कोणताही नफा उरत नव्हता," असे ढाका येथील सर्वात मोठ्या माशांच्या घाऊक व्यापाऱ्यांपैकी एक असणारे दास यांनी सांगितले. तसेच पश्चिम भारतातील हिल्सा इतक्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशच्या बाजारपेठेत दाखल झाल्याचेही त्‍यांनी नमूद केले.

हिल्‍सा आहे बांगलादेशाचा राष्‍ट्रीय मासा

'माशांची राणी' म्हणून ओळखली जाणारी हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंच्या बंगाली पाककृतींमध्ये त्याला विशेष स्थान आहे. मात्र, बांगलादेशातील ग्राहकांना 'गुजरात हिल्सा'मध्ये 'पद्मा हिल्सा'सारखी चव आणि सुगंध अनुभवता आला नाही. पुरवठा कमी झाल्यावरज्या व्यापाऱ्यांनी गुजरातकडे धाव घेतली होती, त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या; कारण पश्चिम भारतातील या माशाला बांगलादेशात फारशी पसंती मिळाली नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT