Crime Against Women Pudhari
आंतरराष्ट्रीय

Franc Non-consensual Act: शारीरिक संबंधातील असहमती म्हणजेच लैंगिक अत्याचारच, फ्रान्समध्ये ऐतिहासिक विधेयकाला मंजुरी

बहुचर्चित गिसेल पेलिकॉट सामूहिक बलात्कार प्रकरण खटल्‍यानंतर देशात कायदा बदलाचे विधेयकाला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

France consent-based rape law

पॅरिस : केवळ फ्रान्‍समध्‍ये नाही तर जगभरासाठी धक्‍कादायक ठरलेल्‍या गिसेल पेलिकॉट सामूहिक बलात्कार खटल्‍यानंतर Gisèle Pelicot Rape Case) फ्रान्‍समधील बलात्‍काराच्‍या कायदेशीर व्‍याख्‍येत बदल करण्‍यात आला आहे. नवीन कायदा विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाली आहे. जाणून घेवूया पेलिकॉट खटला नेमका काय होता आणि फ्रान्‍सने आता बलात्‍काराच्‍या कायदेशीर व्‍याख्‍येत केलेल्‍या बदलाविषयी...

जगाला हादरवणारे पेलिकॉट सामूहिक बलात्कार प्रकरण

२०२० मध्ये फ्रान्स पोलिसांनी डोमिनिक पेलिकॉट या व्‍यक्‍तीला एका मॉलमध्ये महिलांचे व्हिडिओ बनवताना पकडले होते. त्याला अटक करून घरची झडती घेतली असता, त्याच्या पत्नीवर दशकांहून अधिक काळ झालेल्या बलात्काराचे सुमारे २० हजार व्हिडिओ आणि फोटो सापडले. या सर्व प्रकाराबाबत ७२ वर्षीय पीडित गिसेल पेलिकॉट या अनभिज्ञ होत्‍या. आरोपी डोमिनिक पेलिकॉट याने स्वतः कबूल केले होते की, अनेक वर्षे आपल्या पत्नीला नशायुक्त औषध देऊन ऑनलाइन माध्यमातून अनोळखी लोकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी घरी बोलावले होते. तसेच या घृणास्पद प्रकाराचे तो व्‍हिडिओ शुटिंग करत होता.

पेलिकॉट यांनी दाखवले अफाट धाडस, पीडितांना मिळाला नवा कायदा

या संपूर्ण प्रकरणात ७२ वर्षीय पीडित गिसेल पेलिकॉट यांनी अफाट धाडस दाखवले. अनेक दशके भयानक छळ सहन करणाऱ्या गिसेल यांच्या मते, त्यांच्यासाठी हे लग्न एका प्रेमकथेप्रमाणे होते; पण त्याचा अंत अत्‍यंत वेदनादायी झाला. गिसेल यांनी आपले नाव उघड करण्याची आणि पुरावे सार्वजनिकपणे मांडण्याची संमती दिली होती. या संपूर्ण प्रकरणात डोमिनिकसह ५० लोकांवर दोषारोप सिद्ध झाले, तर केवळ एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. न्यायालयाने सर्व आरोपींना बलात्कार आणि घृणास्पद लैंगिक गैरवर्तन केल्याबद्दल दोषी ठरवले. मुख्य आरोपी डोमिनिक पेलिकॉट याला २० वर्षांची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त, इतर ४९ आरोपींना देखील दोषी ठरवून शिक्षा सुनावण्‍यात आली होती.

फ्रान्‍सने बलात्‍काराच्‍या कायदेशीर व्‍याख्‍येत कोणता बदल केला?

फ्रान्समध्‍ये बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची व्याख्या बदलून असंमतीने केलेल्या कृत्यांना बेकायदेशीर ठरवावे यासाठी वकिलांनी वर्षानुवर्षे आग्रह धरला होता; परंतु पेलिकॉटच्या खटल्यानंतर सर्व असहमतीने केलेल्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणून परिभाषित करण्याचा संमतीवरील चर्चेला वेग आला. बलात्काराच्या कायदेशीर व्याख्येत संमतीची संकल्पना मांडणारा कायदा बुधवारी फ्रेंच कायदेकर्त्यांनी मंजूर केला. आतापर्यंत फ्रेंच कायद्याने लैंगिक अत्याचाराची व्याख्यामध्‍ये बलात्कारासह हिंसा, जबरदस्ती, धमकीद्वारे केलेली कृत्ये अशी होती.आता नव्या कायद्यात असे म्हटले आहे की "कोणतेही असहमतीपूर्ण लैंगिक कृत्य . लैंगिक अत्याचार आहे. महिलेची शारीरिक संबंधांना संमती ही मुक्त आणि माहितीपूर्ण असली पाहिजे, असे त्यात म्हटले आहे. तसेच संमती केवळ पीडितेच्या मौन किंवा प्रतिक्रियेच्या अभावावरून काढता येणार नाही."

कनिष्‍ठ सभागृहात विधेयक बहुमताने मंजूर

बलात्‍काराच्‍या नव्‍या व्‍याख्‍येसंदर्भातील या संदर्भातील विधेयक गेल्या आठवड्यात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने, नॅशनल असेंब्लीने, मोठ्या बहुमताने मंजूर केला होता. केवळ अति-उजव्या पक्षाच्या सदस्यांनी या बदलाला विरोध केला होता. ते बुधवारी वरिष्ठ सभागृह, सिनेटने मंजूर केले. सिनेटर्सनी या विधेयकाच्या बाजूने 327-0 असे मतदान केले, तर 15 सदस्यांनी तटस्थता दर्शविली.दरम्‍यान, नवीन कायद्यातील बदलासाठी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची स्वाक्षरी आवश्यक असेल आणि त्यानंतर फ्रेंच कायदा अनेक युरोपीय देशांच्या कायद्यांशी सुसंगत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT