

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल (suo motu) घेतली आहे. आता या प्रकरणी मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार विभागात शुक्रवार,९ ऑगस्ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थात देशभरात निदर्शने झाली, देशभरातील डॉक्टरांनी या प्रकरणी कठोर कारवाईबरोबरच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली. डॉक्टर आक्रमक झाल्यानंतर कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. या प्रकरणातील आरोपी हॉस्टिटलमधील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला ताब्यात घेतले आहे.