गाझामध्ये अल जझीराचे प्रसिद्ध पत्रकार अनस अल-शरीफ यांच्यासह ५ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. (Source- X)
आंतरराष्ट्रीय

Five Journalists Killed | गाझामधील हल्ल्यात 'अल जझीरा'च्या ५ पत्रकारांचा मृत्यू, एकाचं 'हमास'शी कनेक्शन? IDF चा दावा

इस्रायली लष्कराने हा हवाई हल्ला केला असल्याची पुष्टी केली आहे

दीपक दि. भांदिगरे

Five Al Jazeera Journalists Killed in Gaza

इस्रायलने रविवारी गाझा शहरातील पत्रकारांच्या तंबूवर हवाई हल्ला केला. यात अल जझीराचे प्रसिद्ध पत्रकार अनस अल-शरीफ यांच्यासह ५ पत्रकारांचा मृत्यू झाला. इस्रायली लष्कराने हा हवाई हल्ला केला असल्याची पुष्टी केली आहे. अल-शरीफ यांच्यावर हमासचा हस्तक असल्याचा आरोप होता. पण ते पत्रकार असल्याचे भासवत होते. ते रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार असून ते दहशतवादी सेलचे नेतृत्व करत होते, असा आरोप इस्रायलने केला आहे.

गाझामधून स्वतंत्रपणे वृत्तांकन बंद करण्याच्या उद्देशाने ही ठरवून केलेली हत्या असल्याचे म्हणत अल जझीराने या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना जवळपास दोन वर्षांपासून युद्ध सुरू झाल्यापासूनच्या सर्वात घातक घटनापैंकी एक आहे. ज्यात सुमारे २०० माध्यमांतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असे प्रेस फ्रीडम ग्रुप्सनी म्हटले आहे.

अल जझीरानेही या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी त्यांच्या ५ कर्मचाऱ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. प्रतिनिधी (correspondent) अनस अल-शरीफ, रिपोर्टर मोहम्मद करिकेह, कॅमेरा ऑपरेटर्स इब्राहिम झहेर, मोहम्मद नौफल आणि मोआमेन अलिवा अशी त्यांची नावे आहेत.

मृत्यूच्या काही तास आधीच इस्रायली हल्ल्यांचे फुटेज पोस्ट

पत्रकारांचा हा गट अल-शिफा मेडिकल कॉम्प्लेक्सच्या समोरील तंबूत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणीच मीडिया कर्मचारी थांबत होते. २८ वर्षीय अल-शरीफ यांना युद्धस्थितीचे वार्तांकन करणारे अरबी भाषेतील प्रसिद्ध पत्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच, X वर जवळच झालेल्या इस्रायली हल्ल्यांचे फुटेज पोस्ट केले होते. त्यांच्या मृत्यूमुळे गाझामधील पत्रकारांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या सुरक्षेविना परदेशी पत्रकारांना प्रवेश बंदी आहे. यामुळे स्थानिक पत्रकार सर्वाधिक वृत्तांकन करतात.

अल-शरीफ हा हमासच्या दहशतवादी सेलचा प्रमुख म्हणून काम करत होता. त्याने इस्रायली नागरिक आणि इस्रायली सैन्यावर रॉकेट हल्ले केले होते. गाझामधून मिळालेल्या गुप्तचर आणि कागदपत्रांमध्ये ज्यात रोस्टर, दहशतवादी प्रशिक्षण यादी आणि पगाराच्या नोंदी आदींचा समावेश आहे. यातून सिद्ध होते की तो हमासचा हस्तक होता. प्रेस बॅज हा दहशतवादी कारवायासाठी ढाल नाही, असे इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT