First SMS in 1992 History Of Text Message: 3 डिसेंबर 1992 हा दिवस मोबाईल कम्युनिकेशनच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. कारण याच दिवशी जगातील पहिला SMS पाठवला होता. फक्त 22 वर्षांच्या इंजिनियर नील पॅपवर्थने स्वत:च्या कॉम्प्युटरवरून 'Merry Christmas' असा मेसेज व्होडाफोन नेटवर्कवरुन पाठवला आणि मोबाईल मेसेजिंगचा नवा अध्याय सुरू झाला.
त्या काळात नील पॅपवर्थ ब्रिटनच्या व्होडाफोनसाठी 'शॉर्ट मेसेज सर्व्हिस सेंटर' (SMSC) विकसित करणाऱ्या अँग्लो-फ्रेंच IT कंपनी सेमा ग्रूप टेलिकॉम्समध्ये काम करत होता. हा प्रोजेक्ट सुरुवातीला पेजिंग सर्व्हिससाठी डिझाईन केला होता. या सिस्टीमची टेस्ट घेण्यासाठी पॅपवर्थने लंडन जवळच्या सेंटरमध्ये नवी सिस्टीम इंस्टॉल केली आणि कॉम्प्युटरवरून पहिला SMS व्होडाफोनचे डायरेक्टर रिचर्ड जार्विस यांच्या मोबाईलवर पाठवला. ते त्या वेळी ख्रिसमस पार्टीत होते.
त्यानंतर पॅपवर्थला फोन आला आणि मेसेज पोहोचल्याची माहिती देण्यात आली. मजेशीर बाब म्हणजे त्या काळात मोबाईल फोनवर SMS RECEIVE करता येत होते, पण SEND करण्याची सुविधा नव्हती.
आज आपण ज्या सहजपणे फोटो, व्हिडिओ, इमोजी पाठवतो, त्या काळात फक्त टेक्स्ट मेसेज पाठवणे ही खूप मोठी गोष्ट होती. नंतर एका मुलाखतीत पॅपवर्थ म्हणाला होता, “तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की ही सर्व्हिस जगभर लोकप्रिय होईल. माझ्यासाठी हे काम फक्त ऑफिसचं काम होतं.”
यानंतर अवघ्या एका वर्षात नोकियाने SMS सुविधा असलेला पहिला मोबाईल फोन बाजारात आणला. मात्र सुरुवातीच्या काही वर्षांत फक्त एकाच नेटवर्कमध्ये मेसेज पाठवता येत होते. 1999 मध्ये प्रतिस्पर्धी मोबाईल कंपन्यांनीही SMS एक्स्चेंज करण्याची सुविधा ग्राहकांना दिली आणि त्यानंतर टेक्स्ट मेसेजची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली.
मेसेज करण्यासाठी त्यावेळी 160 कॅरेक्टरची मर्यादा होती. त्यावेळी कीपॅडवर टायपिंग करण्यासाठी बऱ्याच अडचणी यायच्या. त्यामुळे शॉर्टफॉर्मची 'SMS भाषा' तयार झाली, युवा पिढीला मेसेजिंगची नवी सवय लागली. प्री-पेड प्लान्समुळे SMSच्या वापरात मोठी वाढ झाली.
मोबाईल टेक्सटिंगचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आणि तिथेच त्याचा विस्तारही झाला. 2001 पर्यंत प्रत्येक महिन्याला एक अब्ज (100 कोटी) SMS पाठवले जात होते. प्रति मेसेज 10 पेन्स आकारण्यात येत असल्याने टेलिकॉम कंपन्यांना महिन्याला जवळपास 100 दशलक्ष पौंड (सुमारे 800 कोटी) महसूल मिळत होता.
2010 पर्यंत जगभरात दर मिनिटाला दोन लाख SMS पाठवले जात होते. परंतु 2012 पासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. व्हॉट्सअॅपसह विविध इंस्टंट मेसेजिंग अॅप्सच्या वाढीमुळे SMS पाठवण्याची गरज कमी झाली. स्वस्त डेटा प्लॅन्स आणि इंटरनेटवर मिळणाऱ्या मोफत मेसेजिंगमुळे SMSचा वापर हळूहळू कमी होत गेला.
आज जवळपास सर्व टेलिकॉम कंपन्या दिवसाला 100 SMS मोफत देतात. परंतु एक काळ असा होता, जेव्हा SMS पाठवण्यासाठीही वेगळा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागत होता. इंटरनेट महाग असल्याने आणि मेसेजिंग अॅप्स अस्तित्वात नसल्याने, SMS हीच लोकांसाठी सर्वात सोपी संवादाची सोय होती.
पहिल्या “Merry Christmas” मेसेजने सुरू झालेला टेक्स्टिंगचा अध्याय आज इंटरनेट मेसेजिंगमध्ये बदलला असली तरी, SMS हा मोबाईल कम्युनिकेशनच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.