Europe violent protests inflation : वाढलेली महागाई, निवाऱ्याचा मोठा प्रश्न आणि राजकीय नेतृत्वाविरुद्ध फ्रान्स, इटलीसह अनेक युरोपीय देशांमध्ये निदर्शने तीव्र झाली आहेत. शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) फ्रान्स, बेल्जियम, इटली, पोर्तुगाल आणि अल्बेनियामधील विविध शहरांमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. फ्रान्समध्ये वाढत्या किमती आणि सार्वजनिक सेवांमधील घसरणीच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले. अलीकडच्या काळातील ही सर्वात हिंसक निदर्शने ठरली आहेत.
फ्रान्समध्ये वाढत्या किमती आणि खालावत चाललेली सार्वजनिक सेवा याविरोधात गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या निदर्शनांपैकी एक आंदोलन पाहायला मिळाले. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. देशात हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचार प्रकरणी एकूण २७२ जणांना अटक करण्यात आली आहे. पॅरिस, मार्सेल, रेनेस, टूलूज आणि एंगर्स यांसारख्या शहरांमध्ये नकाबधारी व्यक्तींकडून तोडफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये लूटमार करण्याचा प्रयत्न, पोलिसांशी झटापट, रस्त्यावरील साहित्याला आग लावणे तसेच सत्ताकेंद्र आणि वृत्तसंस्थांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या सर्व प्रकारासाठी मंत्रालयाने 'अल्ट्रा-लेफ्ट' गटांना जबाबदार धरले आहे. लियॉन शहरात निदर्शकांनी एका पर्यटक कार्यालयाला आग लावली. गेल्या महिन्यात पॅरिसमधील उच्च माध्यमिक शाळांमधून या आंदोलनाची ठिणगी पडली होती. शिक्षकांची कमकुवत झालेली स्थिती आणि अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण झालेला रोष पुढे एका मोठ्या आंदोलनात बदलला, ज्यामध्ये विषमता, सरकारी खर्च आणि नागरिकांचे खालावत चाललेले राहणीमान या प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला.
शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये, विशेषतः चॅम्प्स-एलिसीज आणि आर्क डी ट्रायंफ या प्रसिद्ध परिसरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निदर्शकांनी चमकणारे जॅकेट (हाय-व्हिज जॅकेट) परिधान करत रस्ते अडवून धरले. हे दृश्य राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांच्या मागील कार्यकाळातील गाजलेल्या 'येलो वेस्ट' आंदोलनाची आठवण करून देणारे ठरले. फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकार्नू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देश हिंसेसमोर कधीही झुकणार नाही. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना घडलेल्या या घटनांवर भाष्य करताना लेकार्नू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, कोणालाही हिंसेच्या बळावर आपला राजकीय अजेंडा लादू दिला जाणार नाही.
फ्रान्समधील आंदोलनाचे पडसाद आता बेल्जियममध्येही उमटू लागले आहेत. लिज शहरात शनिवारी शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वाढता खर्च, वर्गांमधील वाढती गर्दी आणि अभ्यासाच्या साहित्याचा तुटवडा याविरोधात आवाज उठवला. या आंदोलनादरम्यान पोलिसांशी झालेल्या संघर्षात काही जणांना अटकही करण्यात आली.
ब्रसेल्समध्येही शनिवारी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले होते. यातील काही निदर्शक पोलिसांशी भिडले. बेल्जियममधील हे आंदोलन काही प्रमाणात फ्रान्समधील घटनांपासून प्रेरित असल्याचे मानले जात आहे. येथील विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे की, शिक्षणाचा वाढता खर्च आणि ज्या सुधारणांमुळे उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणे आणखी कठीण होईल, अशा धोरणांचा ते विरोध करत आहेत.
बऱ्याच निदर्शकांनी तोंडाला मास्क लावले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा आणि वॉटर कॅनन्सचा वापर केला. बेल्जियमचे गृहमंत्री बर्नार्ड क्विंटिन यांनी म्हटले आहे की, आता ही केवळ आंदोलनाची परिस्थिती राहिलेली नाही; उपद्रवी घटकांशी कठोरपणे निपटून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.
इटलीच्या मिलान शहरात महागाईविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. मध्यवर्ती कॅथेड्रल चौक खाली करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. बोलोन्यामध्येही निदर्शकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅनन्सचा वापर करण्यात आला. 'अन्सा' वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
अल्बेनियामध्ये पंतप्रधान एडी रामा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सलग पाचव्या दिवशी निदर्शने सुरू ठेवली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी निदर्शकांवर रबर गोळ्यांचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.तसेच पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये घरे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. २०१७ पासून देशात घरांच्या किमती दुप्पट झाल्यामुळे तिथे गंभीर आवास संकट निर्माण झाले आहे. देशातील सर्वात मोठी कामगार संघटना 'सीजीटीपी'ने या मोर्चाचे आवाहन केले होते. संघटनेच्या दाव्यानुसार, राजधानीतील मुख्य मार्गांपैकी एका मार्गावर हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते.