

लंडन : युरोप सध्या केवळ तापत नसून अक्षरशः भाजून निघत आहे. तापमानाचे जुने विक्रम मोडले जात असून, उन्हाची ही तीव्र लाट आता केवळ हवामानातील अपवाद राहिलेली नसून तो एक नवा नियम बनत चालली आहे. परंतु, युरोपची ही ‘हीट स्टोरी’ इतक्या वेगाने का गंभीर होत आहे?
युरोप हा जगातील सर्वात वेगाने तापणारा खंड बनला आहे. असे नाही की येथे अचानक याच वर्षी उष्णता वाढली आहे; शास्त्रज्ञ याला दीर्घकालीन हवामान बदलाशी (क्लायमेट चेंज) जोडत आहेत. ‘कॉपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ अनुसार, १९९० च्या दशकाच्या मध्यापासून युरोपचे तापमान दर दशकाला सुमारे ०.५६ अंश सेल्सिअस या दराने वाढले आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने आहे. याच काळात जगाचे सरासरी तापमान ०.२७ अंश सेल्सिअसने वाढले. सोप्या भाषेत सांगायचे तर, युरोपचे तापमान दर दहा वर्षांनी वाढत असून संपूर्ण जगाच्या तुलनेत ते दुप्पट वेगाने तापत आहे. युरोपमध्ये तापमान वाढण्यामागे एकच कारण नसून, यामागे अनेक मोठी कारणे आहेत.
प्रथम ग्रीनहाऊस गॅस इफेक्टबद्दल विचार करूया, जो बदल संपूर्ण जगावर परिणाम करत आहे. जेव्हा वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारख्या वायूंचे प्रमाण वाढतच जाते त्यावेळी समस्या निर्माण होते. हे वायू पृथ्वीवरून बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा काही भाग रोखून धरतात, ज्यामुळे पृथ्वी तापत राहते. यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की, ही तापमानवाढ सर्वत्र सारखी नसते. युरोपमध्ये जमिनीचा मोठा भूभाग असल्याने समुद्राच्या तुलनेत येथील तापमान वेगाने वाढते. युरोपमध्ये उन्हाळ्यात उच्च दाब प्रणाली (हाय प्रेशर सिस्टीम) दीर्घकाळ एकाच ठिकाणी टिकून राहते. त्यामुळे हवेच्या मार्गात एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो. ढग आणि थंड वारे त्या भागापर्यंत सहज पोहोचू शकत नाहीत, तर दुसरीकडे आकाश ढगमुक्त राहिल्याने सूर्य सातत्याने जमिनीला तापवत राहतो.
याचा परिणाम असा होतो की, गरम हवा एकाच ठिकाणी अडकून राहते आणि तापमान सतत वाढत जाते. ही स्थिती अनेक दिवस राहिल्यास उष्णतेची लाट अधिक धोकादायक बनते. अशा दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या हवामानाच्या पॅटर्नला ‘ब्लॉकिंग पॅटर्न’ म्हटले जाते. युरोपमध्ये हवेच्या प्रवाहाचा पॅटर्नही बदलत आहे. जेट स्ट्रीमचा मार्ग आणि वेग यातील बदलांमुळे गरम हवा अनेकदा एकाच भागात अडकून पडते. वर तयार झालेली हाय प्रेशर सिस्टीम या उष्णतेला बाहेर पडू देत नाही. यामुळे तेथे ‘हीट डोम’सारखी स्थिती निर्माण होते आणि तापमान सलग अनेक दिवस वाढत राहते.