Trump vs Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मागील आठवडयात केलेल्या काही पोस्ट्सबाबत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती व टेस्ला कंपनीचेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क ( Elon Musk) यांनी पश्चाताप व्यक्त केला आहे. मस्क यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं आहे की, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या जोडीदार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या काही पोस्ट्सबाबत त्यांना आता पश्चाताप होत आहे.
मागील काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर गंभीर आराेप केले हाेते. या वादानंतर आता मस्क यांनी स्पष्ट केलं आहे की, ट्रम्पबाबत केलेल्या काही पोस्ट मर्यादेपलीकडे गेल्या होत्या. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "गेल्या आठवड्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल मी काही पोस्ट केल्या, त्याबद्दल मला खेद आहे. त्या पोस्टने मर्यादा ओलांडली हाेती."
मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून म्हटले होते की, “मोठा खुलासा करण्याची वेळ आली आहे” आणि यामध्ये ट्रम्प यांचे नाव जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्समध्ये असल्याचा दावा केला होता. यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्यावर लावलेल्या लैंगिक शोषण संबंधित आरोपांची पोस्ट सोशल मीडियावरून हटवली होती.
गुरुवारी मस्क यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन एकत्र एका पार्टीत दिसत होते. त्यासोबत मस्क यांनी म्हटले होते की ट्रम्प यांचं नाव एप्स्टीनच्या फाईल्समध्ये आहे आणि हेच कारण आहे की या फाईल्स कधीच सार्वजनिक झाल्या नाहीत. “ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा, सत्य लवकरच समोर येईल,” असा इशारा देखील त्यांनी एका दुसऱ्या पोस्टमध्ये दिला होता. मात्र सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाल्यानंतर मस्क यांनी या सर्व पोस्ट हटवल्या आहेत. यानंतर त्यांच्या ट्रम्पविरोधी भूमिकेमध्ये नरमाई दिसून आली होती.
जेफ्री एप्स्टीन हा एक अमेरिकन अब्जाधीश होता. त्यांच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि तस्करीचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जेलमध्ये त्याने आत्महत्या केली होती.एप्स्टीनच्या संपर्क यादीत अनेक उच्च-प्रोफाईल व्यक्तींची नावे होती. यामध्ये बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू, मायकल जॅक्सन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होता.
या प्रकरणात व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेची भूमिका खूप महत्त्वाची होती. तिने स्पष्टपणे सांगितले होते की एप्स्टीन तिला आणि इतर अल्पवयीन मुलींना बडे राजकारणी, अब्जाधीश आणि सेलिब्रिटींकडे पाठवत होता. तिने ट्रम्पशीही काही वेळा भेट झाल्याचे सांगितले होते. दुर्दैवाने, 25 एप्रिल 2025 रोजी व्हर्जिनिया गिफ्रेचा मृतदेह सापडला आणि तिने जीवन संपवले असल्याचे मानले गेले.