dubai petrol pump worker salary uae fuel station jobs
पुढारी ऑनलाईन : भारतासह पाकिस्तान, नेपाळ, फिलिपिन्स यांसारख्या देशांतील अनेक लोक रोजगारासाठी दुबईला जातात. त्यापैकी बरेच जण पेट्रोल पंपांवरही काम करतात. अशा वेळी त्यांना नेमका किती पगार मिळतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर जाणून घेऊया दुबईतील पेट्रोल पंपांवरील नोकऱ्यांचे स्वरूप आणि त्यातून मिळणारे उत्पन्न.
दुबईमध्ये भारतातील इंडियन ऑइल किंवा भारत पेट्रोलियमप्रमाणेच ADNOC, ENOC आणि Emarat यांसारख्या कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. या कंपन्यांच्या फ्यूल स्टेशनवर ग्राहकांना इंधन पुरवले जाते. येथे पेट्रोल भरणे, कार वॉशिंग, टायरमध्ये हवा भरणे, कॅशियरचे काम अशा विविध पदांसाठी कर्मचारी नियुक्त केले जातात. या नोकऱ्यांमध्ये प्रामुख्याने भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि फिलिपिन्समधील नागरिक काम करताना दिसतात.
नोकरी कशी मिळते?
दुबईतील फ्यूल स्टेशनवर नोकरी मिळवण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. काही कंपन्या थेट भरती करतात, तर काही ठिकाणी तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) एजन्सीमार्फत कर्मचारी नियुक्त केले जातात.
काही कंपन्या कर्मचाऱ्यांना पगारासोबत राहण्याची आणि जेवणाची सुविधाही देतात. तर काही कंपन्या केवळ पगार देतात आणि राहण्याचा व जेवणाचा खर्च कर्मचाऱ्यांनाच करावा लागतो.
कोणाला प्राधान्य दिले जाते?
या नोकऱ्यांसाठी साधारणपणे बारावी किंवा हायस्कूल उत्तीर्ण असणे आवश्यक असते. याशिवाय मूलभूत इंग्रजी बोलता येणे, ग्राहकांशी संवाद साधण्याचा अनुभव आणि शारीरिक तंदुरुस्ती यांना महत्त्व दिले जाते. बहुतांश ठिकाणी 35 वर्षांखालील उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
किती मिळतो पगार?
पद आणि जबाबदाऱ्यांनुसार पगारात फरक असतो. कार वॉशिंगसारख्या कामांमध्ये तुलनेने कमी वेतन मिळते, तर कॅशियरसारख्या पदांवर अधिक पगार दिला जातो.
साधारणपणे दुबईतील पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 1,000 ते 2,000 AED इतका पगार मिळतो. ज्या कंपन्या राहण्याची आणि जेवणाची सुविधा देत नाहीत, त्या काही वेळा 2,400 AED पर्यंत वेतन देतात.
भारतीय चलनात याचा विचार केला तर सरासरी मासिक उत्पन्न सुमारे 40 हजार रुपये इतके होते. काही फ्यूल स्टेशनवर अनुभव आणि पदानुसार 60 हजार रुपयांपर्यंत पगारही मिळू शकतो.