US dooms day test Minuteman 3 missile
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षणासाठी अंतराळातून सिद्धता करण्यात येणारा गोल्डन डोम प्लॅन सांगितल्यानंतर लगेचच अमेरिकेने एका ताकदवान अशा मिसाईलची यशस्वी चाचणी केली. यातून अमेरिकेने त्यांची अण्वस्त्र ताकद आणि सज्जताच दाखवून दिली आहे.
मिनिटमॅन-3 या क्षेपणास्त्राची चाचणी अमेरिकेने घेतली. 15000 किलोमीटर वेगाने हे क्षेपणास्त्र झेपावले आणि त्याने लक्ष्यभेद केला. याचा व्हिडिओही अमेरिकेने एक्सवरून शेअर केलाआहे. अमेरिकेच्या हवाई दलाने स्पष्ट केले आहे की, मिनिटमॅन III क्षेपणास्त्र अद्याप प्रभावी प्रतिबंधक राहील, याची खात्री करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत.
अमेरिकेच्या हवाई दलाने कॅलिफोर्नियामधील व्हॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेस येथून अण्वस्त्र क्षमतेने सज्ज मिनिटमॅन III इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) ची चाचणी घेतली. अधिकाऱ्यांनी याला "डूम्सडे मिसाइल टेस्ट" असे संबोधले असून, या चाचणीचा व्हिडिओही समोर आला आहे. ही चाचणी अमेरिका आपल्या अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमतेच्या बळकटीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे दर्शवते.
हे क्षेपणास्त्र सुमारे 4200 मैलांचा प्रवास करत 15000 मैल प्रती तासाहून अधिक वेगाने मार्गक्रमण करून मार्शल आयलंड्समधील क्वाजालिन अॅटोलवरील रोनाल्ड रेगन बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स टेस्ट साईटपर्यंत पोहोचले.
यामध्ये मार्क-21 हाय-फिडेलिटी री-एंट्री व्हेईकल बसवले होते, जे प्रत्यक्ष युद्धस्थितीत अण्वस्त्र वाहून नेतात.
मिनिटमॅन III प्रोगॅम अमेरिकेत 1970 च्या दशकात सुरू झाला होता आणि लवकरच सेंटिनल प्रणाली याची जागा घेणार आहे. तोपर्यंत, अमेरिकेने या प्रणालीसाठी आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे, जेणेकरून ती एक प्रभावी अण्वस्त्र प्रतिबंधक व्यवस्था म्हणून काम करू शकेल.
यूएस ग्लोबल स्ट्राईक कमांडचे कमांडर जनरल थॉमस बुसिएरे यांनी या चाचणीचे महत्त्व सांगताना म्हटले की, "ही ICBM चाचणी आपल्या देशाच्या अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमतेचे बळ दर्शवते आणि ट्रायडच्या या पायाची (ICBM) तयारी ठळकपणे दर्शवते."
ते पुढे म्हणाले की, "ही शक्तिशाली सुरक्षा प्रणाली आमच्या समर्पित हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. मिसाईल ऑपरेटर्स, सुरक्षा कर्मचारी, हेलिकॉप्टर चालक आणि इतर टीम्स जे राष्ट्रासाठी व त्याच्या सहयोगींना सुरक्षित ठेवण्यासाठी अविरत काम करतात त्यांना हे यश समर्पित आहे."
ही चाचणी अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच “गोल्डन डोम” नावाच्या राष्ट्रीय मिसाईल संरक्षण योजनेसाठी $25 अब्ज निधी जाहीर केला आहे.
गोल्डन डोम योजनेद्वारे अमेरिकेला हायपरसोनिक, क्रूझ मिसाईल्स आणि ड्रोन यांसारख्या विविध प्रकारच्या धोक्यांपासून अंतराळातूनच संरक्षण पुरविले जाईल. तसेच प्रतिहल्लाही केला जाईल. ट्रम्प यांना वाटते की, ही योजना संयुक्त अण्वस्त्र संरक्षण आणि मिसाईल संरक्षणासाठी निर्णायक टप्पा ठरेल.
डूम्स डे याचा अर्थ पृथ्वीच्या विनाशाचा दिवस. काही धर्मांमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कयामत का दिन असेही या दिवसाला म्हटले जाते. ज्या दिवशी पूर्ण पृथ्वी नष्ट होईल तो हा दिवस असेल, असे मानले जाते.
डूम्स डे मिनिटमॅन मिसाईल प्रोजेक्टमधील मिसाईल अण्वस्त्र वाहून नेणारे मिसाईल आहे. अण्वस्त्रांची क्षमता प्रचंड विनाशकारी आहे. त्यामुळे पूर्ण शहर नष्ट होऊ शकते.
त्यातून महायुद्ध भडकून मानवजातच नष्ट होऊ शकते. मानवजातीचा शेवट म्हणजेच डूम्स डे. म्हणूनच कदाचित याला डूम्स डे असेही म्हटले गेले असण्याची शक्यता आहे.