

Donald Trump on NBC Reporter
वॉशिंग्टन : मध्यपुर्वेतील कतार या देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खास विमान भेट दिले आहे. अलीकडच्या काळात त्या विमानाची मोठी चर्चा जगभरात सुरू आहे. याच बोईंग 747 विमानाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून ट्रम्प एका पत्रकारावर जाम भडकले.
व्हाईट हाऊसमध्येच हा प्रकार घडला. यावेळी ट्रम्प यांनी संबंधित पत्रकाराला 'तु वाईट पत्रकार असून पत्रकार व्हायला जे लागते ते तुझ्यात नाही,' असे म्हणत राग व्यक्त केला.
ही घटना ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान घडली. दरम्यान, ट्रम्प यांनी त्या पत्रकारावर इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवत असल्याचा आरोप केला.
विशेषतः दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या शेतकऱ्यांवरील हिंसाचार व वर्णद्वेषी कायद्यांबाबत चर्चा सुरू असताना मुद्दा भरकटवला जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प संताप व्यक्त करत म्हणाले की, तु पुरेसा हुशार नाहीस, तू एक वाईट पत्रकार आहेस. तु काय बोलतो आहेस? कतारने गिफ्ट दिलेल्या जेटशी काय संबंध? ते विमान अमेरिकन हवाई दलाला देत आहेत, आणि ही एक चांगली गोष्ट आहे," असे ट्रम्प यांनी पत्रकाराला सुनावले.
"आम्ही इथे अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलत आहोत, आणि हे NBC (वृत्तवाहिनी) चे लोक त्या विषयावरून लक्ष हटवत आहेत. तू एक वाईट पत्रकार आहेस. तुला पत्रकार व्हायला जे लागतं, ते तुझ्याकडे नाही. तू पुरेसा हुशार नाहीस," असेही ट्रम्प म्हणाले.
संबंधित पत्रकाराला केवळ बोलून ट्रम्प थांबले नाहीत. तर त्यांनी NBC आणि त्याच्या पालक कंपनीचे अध्यक्ष आणि CEO ब्रायन रॉबर्ट्स यांच्याही चौकशीची मागणी केली.
"तू NBC च्या स्टुडिओमध्ये परत जा. ब्रायन रॉबर्ट्स आणि जे लोक आहेत तिथे, त्यांची चौकशी व्हायला हवी. तुमचे न्यूज नेटवर्क खूप वाईट प्रकारे चालवले जाते. आणि तू एक निर्लज्ज माणूस आहेस. तुझ्याकडून आणखी प्रश्न नाही," असे ट्रम्प यांनी दटावले.
कतारच्या या भेटीचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले, "हे विमान अमेरिकन हवाई दलाला दिलं गेलं आहे, जी एक चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी $5.1 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक देखील केली आहे."
दरम्यान, कतारने दिलेले हे विमान डोनाल्ड ट्रम्प यांना वापरण्यासाठी सुसज्ज केले जाणार आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पर्नेल यांनी यापुर्वीच सांगितले होते की हे विमान हस्तांतर अमेरिकेच्या सर्व कायद्यांनुसार झाले असून, संरक्षण विभाग या विमानाला राष्ट्राध्यक्षांच्या वापरासाठी योग्य रीतीने सुसज्ज करणार आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर स्पष्ट केलं की, "हे विमान मला दिलं गेलेलं नाही, तर अमेरिकेच्या हवाई दलाला दिलं गेलेलं आहे. कतारने हे विमान भेट दिलं आहे, कारण आपण त्यांचे संरक्षण अनेक वर्षे केलं आहे. जोपर्यंत नवीन बोईंग्स तयार होत नाहीत तोपर्यंत हे विमान तात्पुरत्या Air Force One म्हणून वापरलं जाईल."
NBC न्यूजच्या त्या पत्रकाराचे नाव आहे पीटर अलेक्झांडर. ते NBC न्यूजचे प्रमुख व्हाईट हाऊस प्रतिनिधी आहेत. स्थानिक रिपोर्टर ते प्रमुख रिपोर्टर आणि सबस्टिट्यूट अँकर म्हणून त्यांनी काम केले आहे. 2004 पासून ते NBC News मध्ये आहेत.
इराकमधील 2005 ची निवडणूक, ओसामा बिन लादेनचा मृत्यू, इंडोनेशियन त्सूनामी, तसेच "मिरॅकल ऑन द हडसन" आणि व्हर्जिनिया टेक शूटिंग या घटनांचे कव्हरेज त्यांनी केले.
त्यांनी 2008, 2010, आणि 2016 मधील ऑलिंपिक स्पर्धांचेही वार्तांकन केले. 2012 मध्ये त्यांनी सहकारी पत्रकार अॅलिसन स्टार्लिंग हिच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.