Donald Trump India Tariff: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अचानक भारतावरचा टॅरिफ वाढवण्याबाबत भाष्य केलं. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करता करताच हा बॉम्ब टाकला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिक संबोधनात सोमवारी जर भारताने रशियाकडून तेल खरेदी मुद्यावर मदत केली नाही तर अमेरिका त्यांच्यावर अजून आयात कर अर्थात टॅरिफ वाढवू शकतो.
भारताने रशियाकडून कच्च तेल आयात करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'ते खरं तर मला खूश करू इच्छितात. पीएम मोदी खूप चांगले व्यक्ती आहेत. एक चांगला माणूस. त्यांना माहिती होतं की मी खूश नाहीये. मला खूश करणे गरजेचे होते. आम्ही त्यांच्यावर लवकरच टॅरिफ वाढवू शकतो.'
डोनाल्ड ट्रम्प हे भारत रशियासोबत कच्च तेल खरेदी करतो त्यावर बोलत होते. अमेरिका याला अनेक दिवसांपासून विरोध करत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये भारतावर अमेरिकेने टॅरिफ दुप्पट करत ५० टक्क्यांवर आणला होता. याच्या मागे भारतानं रशियाकडून कच्च तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करणं हे असल्याचं सांगण्यात आलं.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या रशियासोबतच्या भारताच्या व्यापाराबाबतच्या वक्तव्यानंतर उर्जा संबंधीच्या बाबतीत देशात अजून तणाव वाढू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारत रशियाकडून कच्च तेल खरेदी करणार नाही असं आश्वस्त केलं होतं. मात्र त्यानंतर काही महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ वाढवण्याची धमकी दिल्यामुळं वातावरण तणावपूर्ण झालं आहे.
भारताने आपली याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये या गोष्टीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही असं स्पष्ट केलं आहे.
कच्च्या तेलाच्या बाबतीत रशिया हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं यापूर्वी रशिया आणि भारत तेल व्यापारातील पैसा रशिया हा युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धात वापरत आहे असा आरोप केला होता. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करून ते पुन्हा विक्री करून नफा कमवत आहे. अब्जावधी रूपये कमवत आहे असा आरोप देखील अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ लावून पुतीन यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. याकडे जाणकार एक चाल म्हणून पाहत आहेत.