Donald Trump on Iran
वॉशिंग्टन डीसी : इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतरसुद्धा प्रादेशिक युद्ध होण्याची काळजी वाटत नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
Reuters या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "मी सुरुवातीला इस्रायलचा हल्ला थोपवण्यासाठी प्रयत्न केला. इराणला चर्चेसाठी वेळ दिला. पण मी त्यांना 60 दिवसांची मुदत दिली होती. आणि शुक्रवारी 61 वा दिवस होता."
इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर आणि लष्करी तळांवर जोरदार हल्ला करत तेथील काही शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा केला आहे.
ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, अमेरिकेच्या शिष्टमंडळाची इराणसोबतची नियोजित बैठक ओमानमध्ये रविवारी (15 जून) होणार आहे.
मात्र, इस्रायलच्या कारवाईनंतर इराण त्या चर्चेत सहभागी होईल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली आहे. या बैठकीसाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे इराणी शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत.
"इराणसाठी अजूनही वेळ गेलेली नाही," असे स्पष्ट करत ट्रम्प म्हणाले, "ते करार करू शकतात, पण वेळ फार थोडा उरला आहे."
ट्रम्प यांनी आपल्या Truth Social खात्यावर लिहिले आहे की, "इराणी कट्टरपंथीयांनी मोठ्या शौर्याने बोललो, पण त्यांना कळले नाही की काय होणार आहे. आता ते सर्व मेले आहेत, आणि हे अजून वाईट होणार आहे."
ट्रम्प यांनी कबूल केले की, त्यांना आधीपासूनच माहित होते की इस्रायल इराणवर हल्ला करणार आहे. 8 जूनच्या रात्री त्यांनी कॅम्प डेव्हिड येथे वरिष्ठ सुरक्षा सल्लागारांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशीही इराणविषयी बोलणे झाल्याचे सांगितले.
इराणला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला
"मी इराणला नामोहरम होण्यापासून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मला करार व्हावा असे खूप वाटत होते. अजूनही कराराची संधी आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले.
इस्रायलच्या कारवाईबाबत ट्रम्प यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवताना सांगितले की, "आम्ही इस्रायलचे सर्वात मोठे आणि विश्वासू मित्र आहोत." इराणच्या संभाव्य प्रत्युत्तराविषयी विचारले असता त्यांनी उत्तर दिले, "पाहू काय घडते."
इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने शुक्रवारी 100 ड्रोन (मानवरहित विमाने) तेल अवीव्हकडे पाठवली. इस्रायल लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई सुरक्षा प्रणाली या ड्रोनना त्यांच्या सीमेबाहेरच निष्क्रीय करत आहे.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला आहे की, इस्रायलला "कडवट आणि वेदनादायक" परिणाम भोगावे लागतील.
त्यानंतर आज शनिवारी पुन्हा इस्रायलने इराणवर 150 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.