आंतरराष्ट्रीय

viral video | "मी मोदींचे राजकीय करिअर संपवू शकतो" : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खरोखरच असे म्हणाले का? जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे गोंधळ

पुढारी वृत्तसेवा

Trump Modi viral video

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'राजकीय करिअर संपविण्याची धमकी दिल्याचा'व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. टॅरिफवरून मागील काही दिवस भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव दिसत असतानाच, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ट्रम्प यांनी मोदींना इशारा दिल्याचे भासवले जात आहे. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमका व्हिडिओ काय?

सोशल मीडिया युजर्सचा असा दावा आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय भवितव्य नष्ट करण्याची धमकी दिली आहे. मात्र, विश्वसनीय वृत्तसंस्था, व्हाईट हाऊसची अधिकृत निवेदने आणि जागतिक मीडिया रिपोर्ट्सची सखोल पडताळणी केली असता, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे.

ट्रम्प यांनी धमकी दिल्याचा दावा

सोशल मीडिया वापरकर्त्यांचा दावा आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे राजकीय करिअर नष्ट करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. मात्र, विश्वसनीय वृत्तसंस्था, व्हाईट हाऊसची अधिकृत निवेदने आणि जागतिक मीडिया रिपोर्ट्सची सखोल पडताळणी केली असता, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे.

काय आहे वास्तव?

व्हायरल होणारा व्हिडिओ हा ऑक्टोबर २०२५ मधील आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. एका अनौपचारिक संवादादरम्यान, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करणारे विधान केले. ते म्हणाले होते, "मोदी एक महान व्यक्ती आहेत. त्यांना ट्रम्प आवडतात. 'प्रेम' या शब्दाचा अर्थ तुम्ही वेगळ्या प्रकारे घेऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला त्यांचे राजकीय करिअर नष्ट करायचे नाही." यावेळी ट्रम्प धमकी देत नव्हते, तर त्यांची टिप्पणी मैत्रीपूर्ण आणि आदरपूर्ण होती.

ट्रम्प आणखी काय म्हणाले होते?

त्याच वेळी ट्रम्प यांनी भारताच्या राजकीय स्थिरतेची आणि मोदींच्या कार्यकाळाची प्रशंसा केली होती. त्यांनी भारताला एक 'अद्भुत देश' संबोधले आणि मोदी यांनी त्यांच्या अनेक पूर्वसूरींपेक्षा जास्त काळ सत्ता टिकवून ठेवल्याचा उल्लेख केला. मोदी हे 'काळाच्या कसोटीवर उतरलेले नेते' असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले होते.

दिशाभूल करणारा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय करिअर संपवण्याची धमकी दिली, हा व्हायरल दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. हा व्हिडिओ खरा असला तरी, तो संदर्भातून वेगळा करून, सनसनाटी मथळ्यासह पुन्हा शेअर केला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेली टिप्पणी सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण होती, कोणतीही राजकीय धमकी नव्हती हे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT