

PM Modi Donald Trump phone call
नवी दिल्ली : कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे फोनवरून चर्चा झाली. यादरम्यान त्यांच्यात ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा झाली. ट्रम्प यांनी हा फोन करण्याची विनंती केली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर युद्धबंदीवरून सुरू असलेल्या रस्सीखेच दरम्यान दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच थेट चर्चा होती.
पंतप्रधान मोदी आज जी-७ मध्ये सहभागी झाल्यानंतर कॅनडाहून क्रोएशियाला रवाना झाले आहेत. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेतून मध्येच निघून अमेरिकेला परतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले, 'जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांची भेट होणार होती. मात्र ट्रम्प यांना लवकर अमेरिकेत परतावे लागले, त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. यानंतर, ट्रम्प यांच्या विनंतीवरून, आज दोन्ही नेत्यांनी फोनवर चर्चा केली. त्यांनी सुमारे ३५ मिनिटे चर्चा केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून शोक व्यक्त केला होता आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबाही व्यक्त केला होता. त्यानंतर ते पहिल्यांदाच बोलले.
मोदी-ट्रम्प फोन कॉलबद्दल विक्रम मिस्री यांनी सांगितले की, "ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात व्यापाराशी संबंधित कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, भारताने कधीही तृतीय पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही अशी मध्यस्थी स्वीकारणार नाही."
ते म्हणाले की, ट्रम्प यांनी जी-७ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कॅनडाहून परतताना पंतप्रधान मोदींना अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे हे आमंत्रण स्वीकारले नाही. मोदींनी ट्रम्प यांना या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या संभाव्य क्वाड शिखर परिषदेसाठी भारताला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना म्हणाले की, ९-१० मे च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आणि त्यांचे हवाई तळ निरुपयोगी झाले. भारताने पाकिस्तानला दिलेल्या कडक प्रत्युत्तरामुळे त्यांना लष्करी कारवाई थांबवण्यास भाग पाडले. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, मोदी यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा कोणताही संदर्भ नाही. लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील थेट चर्चेतून आणि पाकिस्तानच्या आग्रहावरून घेण्यात आला. या संपूर्ण घटनेत भारत-अमेरिका व्यापार करारावर कोणतीही चर्चा झाली नाही. मोदींनी सांगितलं की, भारत कोणतीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. पंतप्रधानांचे म्हणणे ऐकल्यानंतर ट्रम्प यांना हा मुद्दा समजला आणि त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शविला.