Donald Trump  File Photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump : फ्रान्‍समध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब का उसळला? अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली धक्कादायक कारणे

शिक्षणाच्या मुद्यावरून फ्रान्समध्ये निदर्शने होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump on France protests : शिक्षणाच्या मुद्यावरून फ्रान्समध्ये निदर्शने होत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू आहे, कारण त्यांनी आपली सीमा अशा लोकांसाठी खुली केली आहे ज्यांना त्यांच्याबद्दल तिरस्कार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जॉर्जिया येथील पेरी येथे रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

अमेरिकेचे दिले उदाहरण

ट्रम्प यांनी फ्रान्समधील सध्याच्या परिस्थितीची तुलना अमेरिकेशी केली. अमेरिका आपल्या इमिग्रेशन धोरणांबाबत अतिशय कठोर असल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान अमेरिकेचे सिनेटर जॉन ओसॉफ यांच्यावरही निशाणा साधताना ते म्हणाले की, आपण फ्रान्ससारखे नाही आहोत जे अशा द्वेष करणाऱ्या लोकांना आपल्या देशात प्रवेश करु देतात. परंतु जॉर्जियाचे सिनेटर ओसॉफ हे लाखो अमेरिका-विरोधी आणि तिसऱ्या जगातील देशांमधील स्थलांतरितांना देशात आणू इच्छित आहेत. हे लोक आपली संस्कृती फक्त लुटण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नष्ट करण्याच्या उद्देशाने वावरतात. आपण हे घडू देणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. फ्रान्समध्ये पोलीस आहेत, परंतु त्यांना त्यांचे काम करू दिले जात नाही. आता आंदोलक करणार्‍यांना फ्रान्स आणि तेथील लोकांचा तिटकारा असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला.

अमेरिकेत कठोर इमिग्रेशन नियम

अमेरिकेच्या कठोर इमिग्रेशन नियमांनुसार ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रशासनाने ३ लाखांहून अधिक व्हिसा रद्द केले आहेत. परराष्ट्र विभागानेही यास दुजोरा दिला आहे. गेल्या महिन्यात प्रशासनाने भारताच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिससह आठ कंपन्यांच्या काही ग्रीन कार्ड फाईलिंग्ज गोठवल्या. एवढेच नाही तर, कथित फसवणूक आणि अमेरिकेत नोकऱ्यांचे संभाव्य नुकसान झाल्याच्या कारणावरून नऊ प्रमुख विद्यापीठांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

फ्रान्समध्ये हिंसाचार

दरम्यान, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शनिवारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या वादानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, आंदोलकांनी पोलिसांवर विविध वस्तू फेकून हल्ला केला. फ्रान्स सरकारच्या माहितीनुसार, राजधानीसह देशाच्या विविध भागांत झालेल्या निदर्शनांमध्ये सुमारे ४ लाख १० हजार लोकांनी सहभाग घेतला होता.

पॅरिसमधील मोर्चाला हिंसक वळण

शनिवारी पॅरिसमध्ये सर्वात मोठे आंदोलन झाले. गृह मंत्रालयाच्या अंदाजानुसार, शहराच्या आग्नेय टोकाला काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये १ लाख १० हजार लोक सहभागी झाले होते. या मोर्चाची सुरुवात अत्यंत शांततापूर्ण मार्गाने झाली होती, मात्र नंतर त्याचे रूपांतर हिंसेत झाले. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचे फवारे मारणाऱ्या गाड्यांचा (वॉटर कॅनन) वापर केला. प्रत्युत्तरात आंदोलकांकडूनही पोलिसांवर जोरदार फेरफेक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT