Donald Trump:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा केली आहे. १ ऑक्टोबरपासून परदेशातून येणाऱ्या औषधांवर तब्बल १००% टॅरिफ (कर) लावण्यात येणार आहे. याशिवाय किचन कॅबिनेट्स आणि बाथरूम व्हॅनिटीवर ५०%, फर्निचरवर ३०% आणि हेवी ट्रक्सवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, "१ ऑक्टोबर २०२५ पासून कोणतेही ब्रँडेड किंवा पेटंटेड फार्मास्युटिकल उत्पादन अमेरिकेत तयार होत नसेल तर त्यावर १००% टॅरिफ लावले जाईल." ट्रम्प यांच्या मते, एखाद्या कंपनीचे प्रत्यक्षात तिथे बांधकाम सुरू असेल तर अशा औषध उत्पादनांवर कर लागू होणार नाही.
ऑगस्टमध्ये लावलेले आयात कर आणि व्यापार करार होऊनसुद्धा ट्रम्प अजूनही टॅरिफ लावण्याच्या बाजूने आहेत. ट्रम्प यांचा विश्वास आहे की, या टॅरिफमुळे सरकारची अर्थसंकल्पीय तूट कमी होईल आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे महागाई आणखी वाढू शकते आणि आर्थिक विकासावरही परिणाम होईल. विशेषत: औषधांवरील टॅरिफचा परिणाम भारताच्या फार्मा उद्योगावर पडण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या औषधांच्या आयातीवर १००% टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा भारतातील औषध निर्माण उद्योगावर परिणाम होऊ शकतो. याचे कारण म्हणजे, भारतातील औषध उत्पादकांसाठी अमेरिका सर्वात मोठा बाजार आहे. २०२४ मध्ये भारताकडून अमेरिकेला ३१ हजार ६२६ कोटी (३.६ अब्ज डॉलर्स) किमतीच्या औषधांची निर्यात झाली होती. तर, २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांतच हा आकडा ३२ हजार ५०५ कोटी (३.७ अब्ज डॉलर्स) पर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, १००% टॅरिफ लागल्यामुळे अमेरिकेत भारताची स्वस्त औषधेही महागड्या दरात विकली जातील.
या टॅरिफचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीज, सन फार्मा, ल्युपिन सह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ट्रम्प यांच्या टॅरिफचा सर्वाधिक परिणाम ब्रँडेड किंवा पेटंट असलेल्या औषधांवर पडण्याची शक्यता आहे, तरीही जेनेरिक औषधांबाबतही अनिश्चितता आहे.