Amazon Prime
न्यूयॉर्क : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनला त्यांच्या लोकप्रिय प्राइम सबस्क्रिप्शन (Prime Subscription) संबंधित वाद मिटविण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. कंपनीवर ग्राहकांना प्राइम सबस्क्रिप्शनमध्ये नोंदणी करण्यासाठी दिशाभूल केल्याचा आणि नंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन फी आकारल्याचा आरोप होता. अॅमेझॉनने आता यूएस फेडरल ट्रेड कमिशन (FTC) सोबत समझोता केला असून २.५ अब्ज डॉलरचा (सुमारे २१ हजार कोटी रुपये) दंड भरावा लागणार आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर या महत्त्वपूर्ण समझोत्यामुळे पडदा पडला आहे.
फेडरल ट्रेड कमिशनने आरोप केला आहे की अॅमेझॉनने ग्राहकांना प्राइममध्ये नोंदणी करण्यासाठी दिशाभूल केली आणि त्यानंतर त्यांचे सबस्क्रिप्शन रद्द करणे अत्यंत कठीण केले. बरेच लोक अनिच्छेने प्राइममध्ये सामील झाले, तर काही रद्द करू इच्छित होते परंतु गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे ते तसे करू शकले नाहीत.
या करारानुसार, अॅमेझॉनला १ अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या 'फसव्या नोंदणी पद्धतीं'मुळे नुकसान झालेल्या अंदाजे साडेतीन कोटी ग्राहकांना १.५ अब्ज डॉलरचा परतावा दिला जाईल, अशी माहिती एफटीसीने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. एफटीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत लादलेला हा सर्वात मोठा दंड आहे. हा खटला २०२३ मध्ये बायडन प्रशासनाच्या कार्यकाळात दाखल करण्यात आला होता. कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा समझोता झाला.
समझोत्याचा एक भाग म्हणून अॅमेझॉन आणि अधिकाऱ्यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचे मान्य केले नाही, मात्र कायद्याचे पालन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. कंपनीला एफटीसीने सांगितलेले अनेक बदल लागू करावे लागतील, त्यापैकी मुख्य बदल खालीलप्रमाणे आहेत:
अॅमेझॉन आता नोंदणी प्रक्रियेत "No, I don’t want Free Shipping" हे बटन ठेवू शकणार नाही.
प्राइम सबस्क्रिप्शनच्या अटी स्पष्टपणे आणि ठळकपणे दर्शवणे बंधनकारक असेल.
सदस्यांना कार्यक्रम रद्द करण्यासाठी सोपे मार्ग उपलब्ध करणे अनिवार्य असेल.
अॅमेझॉन प्राइम ग्राहकांना व्हिडिओ स्ट्रीमिंग, संगीत, ई-पुस्तके आणि होल फूड्समध्ये सवलती यासारख्या सुविधा देते. त्याची किंमत वार्षिक १३९ डॉलर किंवा दरमहा १४.९९ डॉलर आहे. सध्या प्राइमचे जगभरात २०० दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. कंपनीच्या मते, जुलै २०२५ च्या तिमाहीत सबस्क्रिप्शन सेवांमधून त्यांनी १२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले, जे मागील वर्षाच्या तुलनेत १२% जास्त आहे.