

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : एच-1बी व्हिसा शुल्कातील वाढ आणि व्यापारातील तणावामुळे भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये काहीसे मतभेद निर्माण झाले असताना, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अत्यंत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. तसेच, दोन्ही नेते लवकरच निश्चितपणे भेटतील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. यासोबतच, पुढील ‘क्वाड’ शिखर परिषदेचे नियोजन सुरू आहे.
आमच्यात मतभेद आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हे स्पष्ट झाले आहे की, आम्ही काही मतभेदांवर काम करत आहोत, विशेषतः व्यापार आणि रशियन तेलाच्या खरेदीच्या बाबतीत आम्ही त्यावर मार्ग काढत आहोत, असे या अधिकार्याने कबूल केले. आम्ही आमच्या मित्रांसोबत स्पष्टपणे बोलतो आणि आम्ही भारताला एक चांगला मित्र आणि भागीदार म्हणून पाहतो, किंबहुना भविष्यातील भागीदार म्हणून पाहतो, असेही ते म्हणाले.