China US spy case
वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेतील नौदल आणि लष्करामध्ये गुप्तचर भरती करण्याच्या आरोपावरून दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही चीनसाठी गुप्तपणे काम करत होते आणि त्यांना नोंदणी न करता परदेशी एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या दोघांची नावे युआन्से चेन (38) आणि लिरेन "रायन" लाई (39) अशी असून, चेन 2015 मध्ये व्हिसावर अमेरिका आला होता आणि त्यानंतर त्याने कायमस्वरूपी रहिवासी दर्जा मिळवला होता. लाई याने यावर्षी सुरुवातीस टेक्सासमध्ये येऊन गुप्तचर कारवाया सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
एफबीआयने दिलेल्या शपथपत्रानुसार, लाई याने 2021 पासूनच चेन याला चीनच्या "Ministry of State Security (MSS)" या गुप्तचर यंत्रणेसाठी तयार करायला सुरुवात केली होती. या काळात त्यांनी विविध गुप्त कारवाया केल्या, त्यामध्ये:
वॉशिंग्टन राज्यातील नौदल तळाचे फोटो काढणे
कॅलिफोर्नियातील नौदल भरती केंद्राचे निरीक्षण
किमान $10,000 ची रोख रक्कम गुप्तपणे एका व्यक्तीला देणे
नवीन भरती झालेल्या नौदल कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे,
विशेषतः ज्या व्यक्तींचे चीनशी काही नाते असेल अशांची निवड
अशा कामांचा समावेश आहे.
एफबीआयच्या म्हणण्यानुसार, चेन याने ही सर्व माहिती चिनी गुप्तचर अधिकाऱ्यांना पाठवली. एका प्रकरणात, चेन याने लाई याला एका नौदल कर्मचाऱ्याबाबत माहिती दिली होती की, "त्याची आई चिनी आहे, वडील आणि आई एकत्र राहत नसून बालपणापासून तो आईसोबत राहत आहे."
या प्रकरणावर अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल पॅम बॉंडी यांनी म्हटलं की, "हे प्रकरण चीनकडून अमेरिकेच्या लष्करामध्ये घुसखोरी करण्याचा सातत्यपूर्ण आणि आक्रमक प्रयत्न असल्याचं सिद्ध करतं."
चीनच्या वॉशिंग्टन दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यु यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "अशा प्रकारच्या आरोपांना कोणताही ठोस पुरावा नाही. याउलट अमेरिका स्वतः चीनविरुद्ध गुप्तचर मोहीम राबवत असते."
याआधी, ऑगस्ट 2023 मध्ये दोन नौदल सैनिकांना चीनला लष्करी माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात युद्धसराव, तांत्रिक तपशील, आणि नौदल हालचाली यासंबंधी माहिती लीक झाल्याचे निष्पन्न झाले होते.
DOJ च्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रमुख जॉन आईसेनबर्ग म्हणाले, "चीनसारख्या देशांची गुप्तचर यंत्रणा वर्षानुवर्षे लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करत असते. हे प्रकरण त्याचेच एक उदाहरण आहे."
ही अटक अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोक्याचे निदर्शक मानली जात आहे. परदेशी गुप्तचर संस्थांकडून लष्करी माहिती मिळवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांवर आघात करण्याच्या दृष्टीने ही मोठी कारवाई मानली जात आहे.