Venezuela crisis China warning to US
बीजिंग : व्हेनेझुएलाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने तात्काळ मुक्त करावे, असा इशारा आज (दि. ४) चीनने दिला आहे. संपूर्ण संघर्ष संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे आवाहनही चीनने अमेरिकेला केले आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "अमेरिकेने पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला बळजबरीने ताब्यात घेऊन देशाबाहेर नेल्याबद्दल चीन तीव्र चिंता व्यक्त करत आहे." तसेच अमेरिकेला कडक इशारा देताना चीनने म्हटले आहे की, "हे पाऊल आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय संबंधांचे मूलभूत निकष आणि संयुक्त राष्ट्र चार्टरच्या उद्दिष्टांचे व तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. चीन अमेरिकेला आवाहन करतो की, त्यांनी निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीच्या वैयक्तिक सुरक्षिततेची खात्री द्यावी, त्यांना त्वरित सोडावे, व्हेनेझुएलाचे सरकार पाडण्याचे प्रयत्न थांबवावे आणि संवाद व चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवाव्यात."
शनिवारी चीनने व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेले हवाई हल्ले आणि मादुरो व त्यांच्या पत्नीच्या अटकेचा निषेध केला होता. चीनने याला 'वर्चस्ववादी कृत्य' म्हटले असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हवाई हल्ले आणि मादुरो व सिलिया फ्लोरेस यांच्या अटकेची घोषणा केल्यानंतर चीनने प्रतिक्रिया दिली होती. एका सार्वभौम राष्ट्राविरुद्ध अमेरिकेने उघडपणे बळाचा वापर करणे आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध अशी कारवाई करणे धक्कादायक असून चीन याचा तीव्र निषेध करतो, असे चीनने म्हटले आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेची ही कृत्ये लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन प्रदेशातील शांतता व सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करणारी आहेत. "आम्ही अमेरिकेला आवाहन करतो की त्यांनी अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षेचे उल्लंघन करणे थांबवावे," असेही चीनने ठणकावून सांगितले आहे. निकोलस मादुरो यांचे सरकार कोसळणे आणि त्यांना अटक होणे हा बीजिंगसाठी मोठा धोरणात्मक धक्का मानला जात आहे. मादुरो यांचे पूर्ववर्ती ह्युगो शावेझ यांच्या काळापासून चीनचे व्हेनेझुएलाशी अत्यंत घनिष्ठ आणि धोरणात्मक संबंध होते.