प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
आंतरराष्ट्रीय

China Navy Expansion Indian Ocean : हिंदी महासागरात चीनची ‘महाकाय’ चाल! ४०० युद्धनौकांसह थेट अमेरिकेलाच दिलं आव्हान

China Navy Expansion Indian Ocean : तैवानच्या आसपासच्या व्यस्त व्यापारी मार्गांवर चीनच्या सुमारे १०० युद्धनौकांची गस्त

पुढारी वृत्तसेवा

China Navy Expansion Indian Ocean : दक्षिण चीन समुद्रापासून ते अगदी हिंदी महासागराच्या सीमांपर्यंत चीनने आपल्या युद्धनौकांचा ताफा प्रचंड प्रमाणात वाढवला आहे. सध्या चीनकडे अमेरिकेपेक्षाही जास्त युद्धनौका असून, चीन ज्या वेगाने नौदलाचा विस्तार करत आहे, त्या वेगाशी बरोबरी करणे अमेरिकेलाही अवघड जात असून लष्करी रणनीतीकारांसाठी ही बाब आता मोठ्या चिंतेचा विषय बनली असल्‍याच वृत्त 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिले आहे.

चीनच्या सुमारे १०० युद्धनौकांकडून दररोज गस्त

चीनचे नौदल आता फक्त आपल्या किनारपट्टीपुरते मर्यादित राहिलेले नाही. दक्षिण चीन समुद्र, जपानजवळील सागरी क्षेत्र आणि तैवानच्या आसपासच्या व्यस्त व्यापारी मार्गांवर चीनच्या सुमारे १०० युद्धनौका दररोज गस्त घालत असल्याचे समोर आले आहे.

चीनच्‍या ताफ्यात अमेरिकेपेक्षा ३५ टक्के अधिक जहाजे

'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने अमेरिकेच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, चीनकडे सध्या ४०० हून अधिक लढाऊ युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. जहाजांच्या संख्येचा विचार केला तर चीनचा हा ताफा अमेरिकन नौदलापेक्षा सुमारे ३५ टक्क्यांनी मोठा आहे. सध्या चीनच्या ताफ्यात ३ विमानवाहू नौका (एअरक्राफ्ट कॅरिअर्स) कार्यरत असून चौथ्या नौकेचे काम वेगाने सुरू आहे. ही चौथी विमानवाहू नौका अणूऊर्जेवर चालणारी असू शकते, असा अंदाज पाश्चात्य संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आधुनिक इतिहासातील शांततेच्या काळातील हा सर्वात मोठा नौदल विस्तार मानला जात आहे.

आशियाई समुद्रांवर चीनची पकड

तैवानभोवती कोणत्याही क्षणी चीनच्या किमान ६ युद्धनौका तैनात असतात, तर लष्करी सरावादरम्यान ही संख्या कित्येक पटीने वाढते. दक्षिण चीन समुद्रात तर ही उपस्थिती तिप्पट आहे. या भागात फिलीपिन्स आणि व्हिएतनामसोबत चीनचा सीमावाद सुरू आहे.केवळ जहाजांची संख्या वाढवणे हा चीनचा उद्देश नसून, आपल्या किनारपट्टीजवळील सागरी क्षेत्रावर पूर्ण वर्चस्व मिळवणे आणि भविष्यातील संघर्षाच्या वेळी अमेरिकेला हस्तक्षेप करण्यापासून रोखणे, हा चीनचा मुख्य हेतू असल्‍याचे अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

चांगक्सिंग बेट ठरतेय युद्धनौकांची ‘फॅक्टरी’

शांघायजवळील चांगक्सिंग बेट सध्या चिनी नौदलाच्या विस्ताराचे मुख्य केंद्र बनले आहे. उपग्रहाने मे महिन्यात घेतलेल्या फोटोंनुसार, या बेटावरील गोद्यांमध्ये एकाच वेळी दोन लढाऊ जहाजे, तीन डिस्ट्रॉयर, दोन फ्रिगेट्स आणि अनेक पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसून आले. २०२३ मध्ये तयार करण्यात आलेली ४०,००० टनांची 'सिचुआन' ही नौका जगातील सर्वात मोठ्या 'ड्रोन कॅरिअर' जहाजांपैकी एक आहे. येथे अणूऊर्जेवर चालणाऱ्या नव्या श्रेणीतील पाणबुड्यांची निर्मितीही सुरू आहे. , २०४० पर्यंत चिनी पाणबुड्या हिंदी महासागर आणि आर्क्टिक समुद्रात नियमितपणे गस्त घालताना दिसतील, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT