China Role In Iran US Ceasefire: इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांची शस्त्रसंधी लागू झाली आहे. या शस्त्रसंधीमुळं अख्ख्या जगाचा जीव भांड्यात पडला आहे. या शस्त्रसंधीत पाकिस्तानची भूमिका असल्याचे सुरूवातीला समोर आले होते. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी देखील पाकिस्तानचा उल्लेख केला होता. मात्र आता नव्या माहितीनुसार या सीजफायरमध्ये पाकिस्तानचा फक्त चेहरा वापरण्यात आला. बाकी जी कीही सूत्रं हलवायची होती ती चीनने हलवली आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकतेच एक वक्तव्य केलं आहे. त्यात त्यांनी कशा प्रकारे २६ फोनकॉल्स केले अन् त्यानंतर हा शस्त्रसंधी करार होऊ शकला हे सांगितलं आहे. या नव्या दाव्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी घडवून आणणे पाकिस्तानच्या आवाक्या बाहेरचा विषय असल्याचं सिद्ध झालं आहे. पाकिस्तान या पडद्या मागून खेळल्या गेलेल्या खेळातील एक पोस्टमन होता हे देखील चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होत आहे.
पाकिस्तान या शस्त्रसंधीचे क्रिडिट घेऊन नोबेल पारितोषिक देखील मागत आहे. दुसरीकडं चीन पडद्याच्या मागे राहून सगळं काही ठीक करण्याची भूमिका पार पाडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनने शेवटच्या क्षणाला इराणवर दबाव टाकला त्यानंतर इराण चर्चा करण्यास तयार झाला. त्यानंतर तणाव कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझवरून इराणला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यांनी सोशल मीडियावरून जर हा सागरी मार्ग खुला केला गेला नाही तर पूर्ण इराणी संस्कृती नष्ट करण्यात येईल अशी धमकी दिली होती. ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वी इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची तयारी पूर्ण झाली होती. इराणच्या अनेक ठिकाणांवर बॉम्ब हल्ला देखील सुरू झाला होता. इराण देखील मागे हटण्यास तयार नव्हता. यामुळं जगात वातावरण टाईट झालं होतं.
जगापुढील मोठा धोका ओळखून पाकिस्तानशिवाय तुर्कीये, इजिप्त, कतार या सारखे देश देखील सीजफायर घडवून आणण्यासाठी पडद्यामागून कार्यरत होते. मात्र या सर्व प्रयत्न करूनही बोलणी काही पुढं सरकत नव्हती. इराणने मागे हटण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र चीनची एन्ट्री होताच सर्व गेम बदलला.
मिळालेल्या माहितीनुसार चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सुद्धाच्यावेळी इराण, इस्त्रायल, रशिया आणि आखाती देशांच्या नेत्यांना २६ फोनकॉल्स केले होते. डेडलाईच्या आधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं इराणला शस्त्रसंधीसाठी तयार करण्याचे प्रयत्न केले होते. शेवटी चीनच्या दबावात येऊन इराणने नरमाईची भूमिका घेतली आणि चर्चा करण्याची तयारी दर्शवली. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मान्य केलं की चीन या संपूर्ण प्रक्रियेत सामील होता.
चीन अमेरिका आणि इराण शस्त्रसंधी करण्यासाठी पुढे का आला याची आर्थिक आणि रणनैतिक कारणे आहेत. चीन हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. जर आखाती देशात तणाव वाढला तर त्याचा ऊर्जेचा पुरवठा प्रभावित होतो. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील कोणत्याही प्रकारची अडचण ही चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका पोहचवू शकते.
याचबरोबर चीनने हे पाऊल जागतिक स्तरावरील एक जबाबदार देश आहोत हे दाखवून देण्यासाठी देखील उचलले. यामुळं त्यांनी जागतिक स्तरावरील एक शक्ती असल्याचे दाखवून दिले. चीन फक्त बळाच्या जोरावर नाही तर वाटाघाटी आणि कूटनितीच्या आधारे देखील समस्या सोडवू शकते. या कृतीमुळं चीनचा या भागातील प्रभाव वाढला आहे.