

Iran US War Update: अमेरिका - इराण - इस्त्रायल युद्धात गेल्या २४ तासात एक वेगळाच आणि मोठा ट्विस्ट आला आहे. इराणने अमेरिकेचे दोन अत्याधुनिक फायटर जेट्स २४ तासाच्या आत पाडल्याने जगभरात चर्चा सुरू आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इराणचे नौदल, लष्कर, मिसाईल अन् वायू सेना सर्व काही उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. मात्र आता हा दावा इराणने बोलून नाही तर कृती करून खोडून काढला. यानंतर इराणच्या संसदेतील स्पीकर्सनी डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली देखील उडवली.
शुक्रवारी इराणच्या लष्कराने अमेरिकेची दोन फायटर जेट्स पाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इराणने जरी अमेरिकेची दोन फायटर जेट्स पाडले असले तरी त्याचा परिणाम वाटाघाटींवर होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेची एफ १५ आणि ए १० वॉरथॉग ही अत्याधुनिक जेट्स इराणे पाडली आहेत. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना एनबीसी न्यूजच्या मुलाखतीदरम्यान, फायटर जेट्स पाडल्यानं त्याचा परिणाम सुरू असलेल्या वाटाघाटींवर होणार का असे विचारले असता डोनाल्ड ट्रम्प यांनी नाही, नक्कीच नाही. हे युद्ध आहे आपण युद्धात आहोत असं थोडक्यात उत्तर दिलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तीनपैकी एक पायलट मिसिंग असल्याबद्दल आणि त्याच्या रेस्क्यू ऑपरेशनच्या डिटेल्सबाबत सांगण्यास नकार दिला. त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवर देखील नापसंती दर्शवली. त्यांच्या मते माध्यमे ज्या प्रकारे कव्हरेज करत आहेत त्यामुळं रेस्क्यू ऑपरेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, या घटनेनंतर इराणचे स्पीकर घलीबफ यांनी खोचक ट्विट केलं. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'इराणला सलग ३७ वेळा पराभूत केल्यानंतर आता हे कोणतीही रणनिती नसलेले युद्ध सत्तापरिवर्तनावरून अरे कृपा करून कोणी आमचे पायलट्स शोधून देता का या पातळीवर घसरलं आहे.' ते आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, 'वा काय छान प्रगती आहे.'
अवघ्या २४ तासात इराणने अमेरिकेची दोन तगडी विमाने खाली पाडली. विशेष म्हणजे इराणने पहिल्यांदाच त्यांच्या हवाई हद्दीत अमेरिकेची लढाऊ विमाने पाडली आहेत. यामुळं आता युद्धाची पुढची दिशा कशी असेल याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
एफ १५ स्ट्राईक ईगल हे विमान इराणने पहिल्यांदा पाडले. त्यानंतर ए १० वॉरथॉग हे दुसरं विमान इराणने पाडलं. मिळालेल्या माहितीनुसार या दोन घटनांमध्ये तीन पायलट्सनी इजेक्ट केलं होतं. त्यातील दोन पायलट्सना अमेरिकेने रेस्क्यू केलं आहे. मात्र एक पायलट हा अजूनही मिसिंग आहे.
इराणच्या सरकारी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार इराणने मिसिंग पायलटला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन लाँच केलं आहे. इराणच्या टेलिव्हिजन रिपोर्टरनुसार कोणीही या पायलटला जिवंत पकडलं तर त्याला बक्षीस देण्यात येईल.