Elon Musk - Bill Gates  x
आंतरराष्ट्रीय

‍Bill Gates: एलन मस्क यांच्यामुळे लाखो गरीब मुलांचा जीव धोक्यात; बिल गेट्स यांचा आरोप

‍Bill Gates: 200 अब्ज डॉलर्स दान देणार तसेच सन 2045 पर्यंत गेट्स फाउंडेशन बंद करणार असल्याचीही घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Bill Gates on Elon Musk

वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर आरोग्य आणि विकासासाठी कार्यरत असलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

दानशूर उद्योजक बिल गेट्स यांनी एलन मस्कवर गंभीर आरोप केला आहे. “जगातील सर्वात श्रीमंत माणूस, जगातील सर्वात गरीब मुलांचा बळी घेत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

बिल यांनी ही टीका यूएसएआयडी (USAID – United States Agency for International Development) या अमेरिकन परदेशी सहाय्यता संस्थेच्या निधी कपात संदर्भात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मस्क यांच्या "Department of Government Efficiency" (DOGE) या नव्या संस्थेने USAID बंद करण्याची घोषणा केली होती. मस्कने ट्विटमध्ये म्हटले होते की, “या संस्थेच्या मरणाची वेळ आली आहे.”

गेट्स म्हणाले, “या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू देशांतील जीवन वाचवणारी औषधं आणि अन्न गोदामांमध्ये पडून खराब होत आहे. पोलिओ, गोवर, एचआयव्ही यांसारख्या रोगांचा पुन्हा उद्रेक होण्याची भीती आहे.”

गाझा प्रांतातील मदत थांबवली; HIV संसर्ग वाढला

गेट्स यांनी यामध्ये एक धक्कादायक उदाहरण देताना सांगितले की, मस्क यांनी गाझा प्रांत येथील मातांच्या आरोग्याशी संबंधित रुग्णालयासाठीचा निधी थांबवला. हे रुग्णालय HIV संसर्गित मातांपासून नवजात बाळांना संसर्ग होऊ नये यासाठी काम करत होते.

मस्कने चुकीच्या समजुतीतून हा निधी थांबवला, असं गेट्स म्हणतात. "त्याला या गोष्टींची नीट माहितीच नाही," असा त्यांचा आरोप आहे.

2045 पर्यंत गेट्स फाउंडेशन बंद होणार; 200 अब्ज डॉलर्स दान देणार

या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी 20 वर्षांत आपलं संपूर्ण वैभव म्हणजेच सुमारे 200 अब्ज डॉलर्स दान स्वरूपात खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर 2045 पर्यंत गेट्स फाउंडेशन पूर्णपणे बंद होणार आहे. मागील 25 वर्षांत फाउंडेशनने 100 अब्ज डॉलर्स खर्च केले होते. पुढील खर्च दुपटीने होणार आहे.

गेट्स म्हणाले, “आपण कायमस्वरूपी फाउंडेशन चालवण्याचा विचार बाजूला ठेऊन, आता अधिक प्रभावी कामगिरीसाठी निधी झपाट्याने खर्च करू. हा अंतिम उपाय असू शकतो – पोलिओ निर्मूलन किंवा HIV वर कायमचा इलाज शोधणे.”

‘मंगळ ग्रहापेक्षा पृथ्वी महत्त्वाची’

गेट्स आणि मस्क यांच्यातील मतभेद नवीन नाहीत. मस्कने 2012 मध्ये ‘गिव्हिंग प्लेज’ साइन केलं होतं, पण त्यानंतर त्याने गेट्सला सांगितलं होतं की, “दानधर्म म्हणजे फसवणूक आहे.” उलट, टेस्लासारख्या व्यावसायिक उपाययोजनांनी हवामान बदलासारख्या समस्यांवर अधिक प्रभावी तोडगा काढता येतो, असे मस्क म्हणाले होते.

गेट्स यांनी मस्कवर याआधीही टीका केली होती "ते फार काळ पृथ्वीवरील समस्यांवर लक्ष देत नाहीत; त्यांच्यावर केवळ मंगळ ग्रहाचं भूत आहे." असे बिल यांनी म्हटले होते.

बिल यांची नाराजी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात USAIDच्या निधीतील कपात झाली, तरी गेट्सनी संयम दाखवला. पण एलन मस्कबाबत त्यांनी थेट आणि स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यांनी मस्कवर “US foreign aid आणि USAID यांच्याबाबत मूळ समजच नाही,” असा घणाघात केला.

‘मी श्रीमंत म्हणून मरणार नाही’ – बिल गेट्स

गेट्स यांनी एक पत्र लिहून स्पष्ट केलं आहे की, “लोक माझ्या मरणानंतर खूप काही बोलतील, पण ‘तो श्रीमंत म्हणून मेला’ हे त्यात असणार नाही. अजून खूप समस्या आहेत सोडवायच्या.” असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT