Candy Crush world record : मोबाईल गेम म्हणजे केवळ फुकट वेळ घालवणे किंवा टाईमपास नव्हे, काही जण मोबाईल गेमवर इतके वर्चस्व मिळवतात की, त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. असेच काही यश बिहारमधील १९ वर्षीय शुभम कुमारने कमावले आहे. त्याने 'कँडी क्रश सागा' (Candy Crush Saga) या मोबाइल पझल गेममध्ये तब्बल २२,२२२ लेव्हल (स्तर) गाठून 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये आपली नोंद केली आहे. बिहारमधील दिघवारा येथील रहिवासी असलेल्या शुभम कुमारने ५ जुलै २०२६ रोजी हा टप्पा गाठला.
'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'च्या अधिकृत वेबसाईटनुसार, 'कँडी क्रश सागा'मध्ये २२,२२२ लेव्हल्स गाठली तेव्हा शुभम कुमारचे वय १९ वर्षे, ८ महिने आणि २५ दिवस होते. या संस्थेने ही कामगिरी "कँडी क्रश सागामधील सर्वाधिक स्तर गाठणारा किशोरवयीन खेळाडू" या श्रेणीअंतर्गत मान्य केली आहे.
'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने यासाठी "Highest Level Achieved in Candy Crush Saga (Teenager)" असे शीर्षक वापरले आहे. याचा अर्थ असा नाही की, सर्व वयोगटांतील कँडी क्रश खेळाडूंपैकी २२,२२२ हाच सर्वोच्च स्तर होता. गेममध्ये सतत नवीन लेव्हल जोडली जात असतानाच कुमारने २२,२२२ वी लेव्हल गाठली. 'किंग कम्युनिटी'ने (King Community) ऑगस्ट २०२६ मध्ये २३,००० वी लेव्हल हा एक महत्त्वाचा टप्पा मानला होता. ही लेव्हल पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना 'कम्युनिटी बॅज' मिळवण्याची संधी दिली होती.
'किंग कम्युनिटी'वरील एका पोस्टमध्ये उसने लिहिले की, शुभम कुमार हा २३,१०५ व्या लेव्हल (स्तर)पर्यंत पोहोचला होता. त्यावेळी उपलब्ध असलेल्या मॅपच्या शेवटच्या टप्प्यावर होता. त्यानंतर उसने २३,१६५ वी लेव्हल गाठल्याचेही सांगितले. हे नंतरचे लेव्हल खेळाडूने स्वतः दिलेले अपडेट्स असून, ते त्याच्या 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'मधील प्रमाणपत्रापेक्षा वेगळे आहेत.
कम्युनिटी प्लॅटफॉर्मवरील आणखी एका पोस्टमध्ये, कुमारने आपल्या या विक्रमाचे वर्णन "वर्षानुवर्षांची निष्ठा, सातत्य आणि 'कँडी क्रश सागा' खेळण्यात घालवलेले असंख्य तास" यांचे फळ असे केले आहे.
'टॉक ई-स्पोर्ट' च्या वृत्तानुसार, कुमार हा सिवान येथील 'गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज'चा विद्यार्थी आहे. बिहार सरकारी विभागाकडून शुभमचे अभिनंदन कुमारच्या या कामगिरीकडे आता गेमिंग समुदायापलीकडेही लक्ष वेधले गेले आहे. बिहारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रशिक्षण विभागाने, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता मिळाल्याबद्दल सिवान येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.
कँडी क्रश हा मोबाईलवर खेळला जाणारा एक अत्यंत लोकप्रिय आणि सोपा ‘रंग जुळवण्याचा’ (पझल) गेम आहे. या गेममध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या एकाच रंगाच्या किमान ३ कँडीज (चॉकलेट्स/गोळ्या) एका ओळीत आणण्यासाठी बाजूच्या कँडीजची अदलाबदल करावी लागते. ३ किंवा त्यापेक्षा जास्त कँडीज एकत्र आल्या की त्या गायब होतात आणि तुम्हाला पॉईंट्स मिळतात. प्रत्येक लेव्हल (स्तर) पार करण्यासाठी तुम्हाला ठराविक चालीत (Moves) एक टार्गेट पूर्ण करायचे असते. जशा लेव्हल्स पुढे जातात, तसा गेम अधिक रंजक आणि आव्हानात्मक होत जातो!