Benjamin Netanyahu, Gadi Eisenkot  File Photo
आंतरराष्ट्रीय

Benjamin Netanyahu: बेंजामिन नेतन्याहूंची सत्तेसाठी अजूनही धडपड; उलटवू शकतात आयझेनकोट यांचा डाव, अरब पक्षाला दिली ऑफर?

इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सरकार स्थापनेची आशा अजूनही सोडलेली नाही.

पुढारी वृत्तसेवा

Benjamin Netanyahu:

नवी दिल्ली: इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सरकार स्थापनेची आशा अजूनही सोडलेली नाही. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी नेतन्याहूंचे प्रतिस्पर्धी आणि 'याशार' पक्षाचे नेते गदी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले असून, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ दिला आहे.

'द टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, आयझेनकोट यांना बहुमत सिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी नेतन्याहू सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत आयझेनकोट यांच्या पक्षाला ४८ जागा मिळाल्या आहेत, तर बहुमतासाठी ६१ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे ते अरब पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यापैकी काहींनी त्यांना पाठिंबा देण्याची तयारीही दर्शवली आहे.

एका वृत्तानुसार, बेंजामिन नेतन्याहू यांनी 'राआम' पक्षाचे नेते मन्सूर अब्बास यांच्याशी संपर्क साधला आहे. मतदानादरम्यान आणि त्यानंतरही नेतन्याहू यांनी अब्बास यांच्याशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मागितला होता. विशेष म्हणजे, नेतन्याहू यांच्यावर कायदेशीर खटलेही सुरू आहेत, ज्यामुळे त्यांचे पुन्हा सत्तेत येणे कठीण झाले आहे.

नेतन्याहू यांच्या एका सहकाऱ्याने मन्सूर अब्बास यांना विचारले की, निवडणुकीनंतर आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यात ते मदत करतील का? यावर अब्बास यांनी उत्तर दिले की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते निवडणुकीच्या अंतिम निकालांची वाट पाहतील. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर, अखेरीस अब्बास यांनी नेतन्याहूंच्या सहकाऱ्याशी संवाद साधणे बंद केले.

मन्सूर अब्बास यांना भडकवण्याचा प्रयत्न

वृत्तानुसार, जेव्हा मन्सूर अब्बास यांनी संवाद थांबवला, तेव्हा नेतन्याहू यांच्या गटाने असा दावा केला की, 'याशार' पक्ष नेतन्याहूंच्या युतीला मोडीत काढू इच्छित आहे. त्यांनी अब्बास यांना प्रश्न केला की, अशा पक्षाला पाठिंबा देऊन ते स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार आहेत का? यावर मन्सूर अब्बास यांनी स्पष्ट केले, "आम्ही आमच्या हिताचे जे काही असेल, तेच करू."

नेतन्याहूंचा पक्ष निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष

निवडणुकीत नेतन्याहू यांच्या गटाला ५३ जागा मिळाल्या आहेत, तर नेतन्याहू यांच्या विरोधातील गटाला ज्याला 'बदल गट' असेही म्हटले जाते ४८ जागा मिळाल्या आहेत. या विखुरलेल्या जनादेशात अरब पक्षांच्या खात्यात १९ जागा गेल्या आहेत. नेतान्याहू यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, परंतु त्यांना स्वतःच्या गटातील सर्व सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आले. 'युनायटेड तोराह ज्युडाइझम' पक्षाच्या सात आमदारांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT