

Pawan Kalyan Divorce
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण व त्यांच्या पत्नी अन्ना कोनिडेला यांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या १३ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि परस्पर आदराने घेण्यात आला आहे. "आयुष्याचा एक मोठा टप्पा एकत्र घालवल्यानंतर आम्ही परस्पर संमतीने आणि आदराने वेगळे होण्याचा मार्ग निवडला आहे. आमचे वैवाहिक नाते जरी संपत असले, तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू. तसेच, आमच्या मुलांसाठी जबाबदार आणि समर्पित पालक म्हणून आमची भूमिका बजावत राहू. मुलांचे सुख आणि उज्ज्वल भविष्य हीच आमची नेहमीची प्राथमिकता असेल," असे या निवेदनात म्हटले आहे.
या कठीण काळात प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, असे आवाहन पवन कल्याण आणि अन्ना यांनी केले आहे. "आयुष्यातील या बदलाच्या काळात सर्वांकडून सामंजस्य आणि आदराची अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो," असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू यांचे धाकटे भाऊ असलेल्या पवन कल्याण यांनी १९९६ मध्ये 'अक्कडा अम्मायी इक्कडा अब्बायी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अन्ना कोनिडेला यांच्याशी त्यांचे तिसरे लग्न झाले होते. यापूर्वी १९९७ मध्ये त्यांनी नंदिनी यांच्याशी विवाह केला होता, परंतु काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी अभिनेत्री-मॉडेल रेणू देसाई यांच्याशी विवाह केला; मात्र २०१२ मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. पवन कल्याण आणि रेणू देसाई यांना अकिरा नंदन आणि आध्या ही दोन मुले आहेत.
त्यानंतर २०१३ मध्ये पवन कल्याण यांनी रशियाच्या अन्ना कोनिडेला यांच्याशी तिसरा विवाह केला होता. या दांपत्याला पोलिना अंजना पवनोवा आणि मार्क शंकर पवनोविच ही दोन मुले आहेत.