Gold Treasure Found  
आंतरराष्ट्रीय

Gold Treasure Found : नाल्याच्या खोदकामावेळी सापडली ८५ कोटींची सोन्याची बिस्किटे अन् दुर्मिळ नाणी! नेमका कोणाचा आहे हा खजिना?

मूळ मालकाला किंवा त्याच्या वंशजांना या खजिन्यावर आपला हक्क सिद्ध करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Treasure Found : गटाराचे नेहमीसारखे दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक जमिनीतून अब्जावधींचा खजिना सापडेल, असा विचार तरी कोणी केला असेल का? पण असाच एक चक्रावून टाकणारा प्रकार बेल्जियममधील 'सिंट-गिलिस-डेंडरमोंडे' शहरात घडला आहे.

सांडपाणी पाईपलाईन टाकण्‍यासाठीच्‍या कामावेळी सापडले घबाड

'सिंट-गिलिस-डेंडरमोंडे' शहरात सीवर (सांडपाणी) पाइपलाइन टाकण्यासाठी कामगार जमीन खोदत असताना, त्यांना जमिनीखाली लपवून ठेवलेला अत्यंत मौल्यवान खजिना सापडला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी, सोन्याचे बिस्किटे आणि सोन्याच्या अत्यंत कीमती सिल्ली (बिल्लेट्स) समाविष्ट आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या खजिन्याची एकूण किंमत जवळपास ९ दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ८० ते ८५ कोटी रुपये इतकी आहे.

...अन् अचानक जमिनीतून बाहेर आले सोने!

ही खळबळजनक घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा १८ वर्षांचा एक विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तेथे मजुरीचे काम करत होता. एका जुन्या बिअर फॅक्टरीजवळ नाली खोदण्याचे काम त्याला मिळाले होते. कुदळ मारत असताना माती आणि भुयारी तळघराच्या जुन्या भिंतीमागे काहीतरी धातू धडकल्याचा आवाज त्याला आला.त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माती बाजूला केली, तेव्हा सुरुवातीला त्यांना ती सामान्य नाणी वाटली. परंतु, अधिक खोलवर खोदकाम केल्यावर सोन्याच्या चमकणाऱ्या छड्या आणि प्राचीन काळातील सोन्याच्या सिल्ली बाहेर येऊ लागल्या.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात खजिना पाहण्यासाठी आणि शोधण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. हस्तगत करण्यात आलेला संपूर्ण खजिना सध्या सुरक्षितपणे सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला आहे.

नेमका कोणाचा आहे हा खजिना?

इतिहासकार आणि तज्ज्ञांच्या मते, हा खजिना १९ व्या शतकातील असावा. त्या काळातील प्रसिद्ध बिअर फॅक्टरीचे मालक 'थियोफिलस वान एशे' यांच्याशी याचा संबंध जोडला जात आहे. तत्कालीन राजकीय उलथापालथ किंवा आर्थिक अनिश्चिततेमुळे त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई तळघराच्या भिंतीत चिनून सुरक्षित ठेवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कित्येक दशकांपासून भिंतीच्या आड गाडला गेल्याने हा खजिना आजपर्यंत कोणाच्याही नजरेत आला नव्हता.

आता या खजिन्याचे पुढे काय होणार?

बेल्जियमच्या कायद्यानुसार, असा एखादा ऐतिहासिक खजिना सापडल्यास त्याच्या मूळ मालकाचा किंवा वारसाचा शोध घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाते. मूळ मालकाला किंवा त्याच्या वंशजांना या खजिन्यावर आपला हक्क सिद्ध करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत कोणताही वैध वारसदार समोर न आल्यास, मालमत्ता कायद्यानुसार हा खजिना ती जमीन ज्याच्या मालकीची आहे त्या मालकात आणि खजिना शोधणाऱ्या मजुरांमध्ये लाभांश स्वरूपात वाटून दिला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT