BBC resignations:
लंडन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे संपादन करून प्रेक्षकांची दिशाभूल करणाऱ्या एका माहितीपटावरून झालेल्या वादानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) चे महासंचालक टिम डेव्ही आणि नेटवर्क न्यूजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेबोरा टर्नेस यांनी रविवारी राजीनामा दिला.
बीबीसीने ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टनमध्ये यू.एस. कॅपिटलवरील हल्ल्यापूर्वी ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाचे भाग एडिट करून प्रसारित केल्याचा आणि यातून दंगलखोरांना प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता. यासह बीबीसी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कव्हरेज, इस्रायल-हमास युद्ध आणि ट्रान्सजेंडर मुद्द्यांसह त्यांच्या वृत्तांकनात तटस्थता राखण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपांमुळे कोंडीत अडकले आहे.
'द टेलीग्राफ' वृत्तपत्राला मिळालेल्या एका अंतर्गत माहितीनुसार, बीबीसीच्या 'पॅनोरमा' या प्रमुख तपास कार्यक्रमात ट्रम्प यांच्या भाषणाचे दोन वेगळे भाग जोडून दाखवण्यात आले होते. मूळ भाषणात ट्रम्प यांनी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले होते, तसेच "आम्ही कॅपिटलकडे जाऊ आणि तिथे आमच्या सिनेटर्स व काँग्रेस सदस्यांना पाठिंबा देऊ," असे म्हटले होते. परंतु, बीबीसीने दाखवलेल्या संपादित क्लिपमध्ये ते वाक्य एडिट केले होते. बीबीसीने हे भाग अशा प्रकारे सादर केले, ज्यामुळे ट्रम्प दंगेखोरांना हिंसेसाठी उकसवत असल्याचा संदेश गेला. निष्पक्षता न राखल्याबद्दल बीबीसीवर ट्रम्प यांच्या कव्हरेजसोबतच इस्रायल-हमास आणि ट्रान्सजेंडर मुद्द्यांवरही टीका झाली होती.
डायरेक्टर जनरल पदाचा राजीनामा देताना टिम डेवी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात हे संपूर्णतः वैयक्तिक कारण असल्याचे स्पष्ट केले. मात्र, "बीबीसी चांगली कामगिरी करत आहे, पण काही चुका झाल्या आहेत आणि डायरेक्टर जनरल म्हणून मला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल," असे कबूल केले. रविवारी राजीनामा जाहीर केल्याने त्यांचा ब्रॉडकास्टरमधील २० वर्षांची कारकीर्द आणि महासंचालक म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ संपला.
न्यूज ऑपरेशनच्या चीफ एक्झिक्युटिव्ह डेबोराह टर्नेस यांनीदेखील पॅनोरमा स्कँडलमुळे संस्थेचे नुकसान झाल्याचे मान्य करत राजीनामा देत असल्याचे सांगितले.