Bangladesh Hindu Youth Burned Alive
नरसिंगडी : बांगलादेशातील नरसिंगडी जिल्ह्यात एका २३ वर्षीय हिंदू तरुणाला गॅरेजमध्ये जिवंत जाळून मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबाने केला असून, या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षा धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, चंचल चंद्र भौमिक असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा क्युमिला जिल्ह्यातील रहिवासी होता. नरसिंगडी येथील पोलीस लाईनजवळील 'मशिद मार्केट' परिसरातील एका गॅरेजमध्ये तो गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होता. शुक्रवारी मध्यरात्री चंचल गॅरेजमध्ये झोपलेला असताना अज्ञात हल्लेखोरांनी बाहेरून शटरवर पेट्रोल ओतून आग लावून दिली. ही आग इतकी भीषण होती की चंचलला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. तस्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत चंचलचा होरपळून मृत्यू झाला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती बाहेरून आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे.
चंचल हा आपल्या कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "ही निव्वळ दुर्घटना नसून एक सुनियोजित हत्या आहे," असे त्याच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. दरम्यान, स्थानिक हिंदू समुदायाच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून प्रशासनाकडे अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.१८ डिसेंबर: ईशनिंदेच्या आरोपावरून दीपू चंद्र दास या कामगाराची जमावाकडून हत्या करून त्याला जाळण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी कालीगंजमध्ये लिटन चंद्र दास या हिंदू व्यापाऱ्याची तर अमृत मंडल, रिपन साहा या तरुणाचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे.