

बांगलादेशातील संपूर्ण लोकसंख्या जिहादी बनलेली नाही. आजही देशात मोठ्या संख्येने लोक पुरोगामी, स्वतंत्र विचारसरणीचे आणि धर्मनिरपेक्ष आहेत, असेही नसरीन यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Taslima Nasreen statement on Bangladesh Violence
नवी दिल्ली: "बांगलादेशात जिहादची दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत, परंतु या दोघांचेही अंतिम उद्दिष्ट भारतविरोध हेच आहे," असा खळबळजनक दावा प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी बांगलादेशातील सध्याची राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आपली सडेतोड भूमिका मांडली आहे.
तस्लिमा नसरीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जिहादचे पहिले रूप मदरशांमधून बाहेर पडलेले तरुण आहेत. हे तरुण दाढी-टोपीत दिसतात. तर दुसरे रूप पाश्चात्य पेहराव करणारे आणि विद्यापीठांच्या पदव्या घेतलेले सुशिक्षित तरुण आहेत. या दोघांची वेशभूषा आणि पार्श्वभूमी वेगळी असली, तरी त्यांची विचारसरणी मात्र सारखीच आहे. "भारताप्रती शत्रूत्वाची भावना ठेवणे आणि पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहणे हेच या दोन्ही गटांचे सामायिक स्वप्न आहे," असे नसरीन यांनी नमूद केले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सांस्कृतिक संबंध संपुष्टात आले, तर त्याचा थेट फायदा कट्टरपंथी शक्तींना होईल. "सांस्कृतिक देवाणघेवाण थांबल्यास जिहादी विचारसरणी फोफावण्याचा धोका वाढतो. द्वेष आणि हिंसाचाराऐवजी संवाद आणि संस्कृती हाच सध्याच्या संकटावरचा उपाय आहे," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
"बांगलादेशातील संपूर्ण लोकसंख्या जिहादी बनलेली नाही. आजही देशात मोठ्या संख्येने लोक पुरोगामी, स्वतंत्र विचारसरणीचे आणि धर्मनिरपेक्ष आहेत. याच लोकांमुळे बांगलादेशला स्वतःला एक सभ्य, आधुनिक आणि गैर-सांप्रदायिक राष्ट्र म्हणून पुन्हा उभे करण्याची संधी आहे," असेही नसरीन यांनी म्हटले आहे.
खेळ, कला आणि संस्कृतीला राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन करत नसरीन म्हणाल्या, "क्रिकेट सुरू राहिले पाहिजे, नाटक आणि चित्रपट जिवंत राहिले पाहिजेत. संगीत, फॅशन आणि पुस्तक मेळ्यांसारख्या उपक्रमांमधून होणारी देवाणघेवाण थांबवू नका. या गोष्टी थांबवल्यास भारताचे कदाचित मोठे नुकसान होणार नाही, पण त्याचा सर्वाधिक फटका बांगलादेशलाच बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.