Axiom-4 mission : संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेले अॅक्सिओम 4 (Axiom-4 mission) मोहिम दोन दिवसांसाठी लांबणीवर पडली आहे. आता 'स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्ट' मंगळवार, १० जून रोजी सायंकाळी ५:५२ वाजता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे (ISS) झेपावेल, अशी माहिती क्वारंटाइनमध्ये असलेल्या अॅक्सिओम-४ मिशन क्रू सदस्यांसोबत व्हर्च्युअल पत्रकार परिषदेवेळी देण्यात आली. या मोहिमेत भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह अन्य तीन अंतराळवीरांचा समावेश आहे. यापूर्वी ही मोहित रविवार, ८ जून रोजी नियोजित होती.
अॅक्सिओम 4 मोहिमेत भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरी या देशांचे प्रत्येकी एक अंतराळवीराचा समावेश आहे. या मोहिमेच्या कमांडर आहेत अंतराळवीर पेगी व्हिट्सन. त्यांनी आतापर्यंत एकूण ६७५ दिवस अंतराळात घालवले असून, ही महिला अंतराळवीरांच्या नावावर एक विक्रमी नोंद ठरली आहे.
या मोहिमेत सहभागी होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शुभांशु शुक्ला म्हणाले की, यापूर्वी फार कमी लोकांनी पृथ्वीला ज्या कोनातून पाहिले त्याच कोनातून मी पृथ्वीकडे पाहण्यास उत्सुक आहे. मी या मोहिमेदरम्यान भारतातील विविध संशोधन संस्थांनी तयार केलेले सात भारतीय प्रयोग करणार आहे. यामध्ये स्टेम सेल्स ते पिकांच्या बियाण्यांपर्यंतच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या संशोधनाच्या प्रगतीस दिशा देणारे ठरतील.
अॅक्सिओम 4 मोहिमेत मी माझा अंतराळीवर क्रमांक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. या बाबत या मोहिमेचे कमांडर पेगी व्हिट्सन यांना त्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण ७३५ लोक अंतराळ मोहिमेत सहभागी झाले आहे. त्यामुळे तीन नवीन अंतराळवीर अनुक्रमे ७३६, ७३७ व ७३८ क्रमांक असू शकतात. शुक्ला यांना या मोहिमेचे पायलट असल्यामुळे कदाचित ७३६ क्रमांक दिला जाऊ शकतो, पण याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेला नाही. ISS वर दोन आठवड्यांच्या मुक्कामात शुभांश शुक्ला विद्यार्थ्यांशी, शैक्षणिक संस्थांशी संवाद साधणार आहेत. या मोहिमेमुळे जर एक तरी तरुण अंतराळाचा अभ्यास करायला प्रवृत्त झाला, तर आमची मोहीम यशस्वी झाली असे आम्ही मानू,” असेही त्यांनी सांगितले.
भारतीय हवाई दलातील पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. शुभांशू शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये झाला. ते जून २००६ मध्ये भारतीय हवाई दलात (IAF) लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. त्यांना मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन म्हणून रँक मिळाली. Su-30MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier आणि An-32 यासह विविध सुमारे २ हजार विमान उड्डाणांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. २०१९ मध्ये त्यांनी रशियातील युरी गागारिन कॉसमोनॉट प्रशिक्षण केंद्रात पदवीपूर्व अंतराळवीर प्रशिक्षण घेतले. देशाची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहिम 'गगनयान' साठी त्यांची इस्रोने निवड केली आहे. ते आता नासा-अॅक्सिओम यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करणारे इस्रोचे पहिले अंतराळवीर ठरतील.