

पुढारी ऑनलाईन डेस्क: NASA moon mission | अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने त्यांच्या चंद्र मोहिमेसंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. NASA ची चंद्र मोहीम २०२५ मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार होती. मात्र नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी यामोहिमेसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.
बिल नेल्सन यांनी म्हटले आहे की, नासाच्या 'आर्टेमिस' या चांद्रयान मोहिम प्रक्षेपणाला विलंब लागू शकतो. 1972 नंतर प्रथमच चंद्र मोहिम पुढे ढकलली आहे. आगामी आर्टेमिस II मिशन, ज्याचे उद्दिष्ट चार अंतराळवीरांना चंद्राभोवती उड्डाणावर पाठवायचे आहे, आता ही मिशन एप्रिल २०२६ मध्ये निश्चित केली आहे. तर त्यानंतरचे आर्टेमिस III चंद्र लँडिंग मिशन २०२७ च्या मध्यामध्ये होणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे. पूर्वी नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष उशीरा 'या' नासाच्या चंद्र मोहिमा प्रक्षेपित होणार आहेत.
नासा मुख्यालयातील पत्रकार परिषदेदरम्यान, नेल्सन यांनी नासाच्या चंद्र मोहिम विलंब होण्याला ओरियन क्रू कॅप्सूलच्या उष्मा शील्डसह निर्माण झालेल्या समस्या कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. तसेच 2022 मध्ये त्याच्या अनक्रिव्ह चाचणी फ्लाइट दरम्यान नुकसान झाल्याचेदेखील म्हटले आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, नासाने आर्टेमिस II साठी कॅप्सूलच्या रिटर्न ट्रॅजेक्टोरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि सध्याची हीट शील्ड डिझाइन कायम ठेवली आहे. हीट शील्ड पुन्हा डिझाईन केल्यामुळे होणारा अधिक व्यापक विलंब टाळण्याचा हा दृष्टिकोन आहे.
अवकाश प्रक्षेपणाचा वाढता खर्च आणि तांत्रिक आव्हाने यादेखील अवकाश मोहिमांना विलंब होण्याची कारणे आहेत. 2025 पर्यंत आर्टेमिस मोहिमेचा अंदाजे खर्च अंदाजे 93 अब्ज डॉलर होता. नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) च्या प्रत्येक प्रक्षेपणाचा खर्च सुमारे 2 अब्ज डॉलर असल्याचेदेखील नेस्लन यांनी म्हटले आहे. नेल्सन यांनी अंतराळ संशोधनात अमेरिकेचे नेतृत्व राखण्यासाठी या नवीन मुदती पूर्ण करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. कारण चीननेदेखील 2030 पर्यंत चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेदेखील परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.