प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari News
आंतरराष्ट्रीय

AI SAFETY ALERT: 2030पर्यंत AI मुळे मानवी हक्क हिरावले जाण्याची शक्‍यता किती टक्के ? संशोधकाचा मोठा इशारा

२०२७ पर्यंतच AI मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक बुद्धिमान बनू शकते

पुढारी वृत्तसेवा

AI Safety Alert : प्रगत AI प्रणालींच्या विकासाचा वेग जाणीवपूर्वक कमी केला नाही, तर २०३० संपण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवजातीचा विनाश होण्याची किंवा मानवाचे नियंत्रण नष्ट होण्याची ५० टक्के शक्यता आहे, असा इशारा AI सुरक्षा संशोधक निकोला जुर्कोविच यांनी दिला आहे.

'अ वॉर्निंग अबाउट AI टू माय लव्हड वन्स'

निकोला जुर्कोविच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर 'अ वॉर्निंग अबाउट AI टू माय लव्हड वन्स' (A Warning About AI to My Loved Ones) शीर्षकाखालील लेख शेअर केला आहे. यामध्‍ये म्हटले आहे की, २०२७ पर्यंतच AI मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक बुद्धिमान होऊ शकते. त्यामुळे या तंत्रज्ञानावरील मानवाचे नियंत्रण कायम राहील की नाही, याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

मानवजातीचा विनाश किंवा तिचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता ५० टक्के

"अत्याधुनिक AI च्या विकासाचा वेग जाणीवपूर्वक आणि लक्षणीयरीत्या कमी केला नाही, तर २०३० संपण्यापूर्वी मानवजातीचा विनाश होण्याची किंवा तिचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता नाणेफेकीइतकीच (५० टक्के) आहे," असे त्यांनी लिहिले आहे. AI मुळे होणारा संभाव्य ताबा किंवा दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या मोठ्या व्यत्ययामुळे २०२७ च्या अखेरीस लोकांना सुट्ट्या साजऱ्या करता येण्याची शक्यता नसल्याचा अंदाजही (५ ते २० टक्के) त्यांनी व्यक्त केला आहे.

जुर्कोविच यांना नेमका कोणता धोका वाटतोय?

राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांनी अधिकाधिक निर्णयक्षमता AI कडे सोपवल्यास प्रगत AI प्रणालींना महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोच मिळू शकते, जैविक शस्त्रे तयार करण्यास मदत होऊ शकते किंवा निर्णयांवर प्रभाव पडू शकतो, असा इशारा जुर्कोविच यांनी दिला आहे.

धोका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक

"आम्ही AI वरील नियंत्रण गमावत आहोत. यंदा होणारे नुकसान 'प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाचे' असेल, तर पुढील वर्षी 'AI मुळे मोठी हानी होऊ शकते. यामध्ये अनेक मृत्यूंचाही समावेश असू शकतो," असे ते म्हणाले. मानवजातीला या तंत्रज्ञानाचा धोका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असून, प्रगत AI च्या पुढील प्रगतीला आळा घालणारे किंवा तिचा वेग कमी करणारे जागतिक नियम तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रगती मंदावणारे जागतिक नियम तयार करणे हाच उपाय

"आमच्या जीवनातील हे व्यत्यय आणि धोके टाळण्याचा मुख्य मार्ग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढील प्रगती रोखणारे किंवा मंदावणारे जागतिक नियम तयार करणे," असे ते म्हणाले.

बहुतांश नोकऱ्या जाण्याची शक्यता

AI मुळे जागतिक रोजगार बाजारपेठेत मोठे बदल होऊ शकतात आणि पुढील एका दशकात सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात, असा इशाराही जुर्कोविच यांनी दिला आहे. "सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नाहीशा होतील आणि पुढील १० वर्षांत जगातील बहुसंख्य लोक बेरोजगार होतील, असे दिसते," असे त्यांनी नमूद केले आहे.

संभाव्य धोक्‍यांसाठी तयार राहण्याचा सल्ला

"मी स्वतः तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी सुमारे दोन आठवड्यांचे अन्न आणि पाणी साठवून ठेवण्यासह तसेच ऑनलाइन बँकिंग प्रणाली विस्कळीत झाल्यास रोख रक्कम तयार ठेवण्यासह जागतिक आपत्तींसाठी वैयक्तिक तयारी करण्याची शिफारस करतो," असे त्यांनी लिहिले आहे.

समन्वयाने धोके टाळता येतील

इतक्या गंभीर चिंता व्यक्त केल्यानंतरही, समन्वयाने केलेल्या कृतीमुळे मानवजातीला हे धोके नियंत्रणात आणता येतील, असे जुर्कोविच यांनी म्हटले आहे. "परिस्थिती चांगली नाही, पण ती सुधारण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. प्रयत्न आणि समन्वयाच्या जोरावर, आपण एक प्रजाती म्हणून या संकटातून सुखरूप बाहेर पडू शकतो," असा विश्वासही निकोला जुर्कोविच यांनी व्यक्त केला आहे.

AI क्षेत्रातील इतर मान्यवरांचेही इशारे

AI उद्योगातील इतर प्रमुख व्यक्तींनीही या तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांबाबत इशारे दिले आहेत.

  • गूगलचे माजी उपाध्यक्ष जेफ्री हिंटन यांनी म्हटले आहे की, पुढील एका दशकात AI मुळे सर्व मानवांचा मृत्यू होण्याची १० टक्के शक्यता आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये 'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय देखरेख यंत्रणेची मागणी करणाऱ्या सुमारे ४०० शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होता.

  • अँथ्रॉपिक (Anthropic) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोदेई यांनीही AI मुळे नागरी व्यवस्थेच्या पातळीवर मोठी आपत्ती येण्याची १० ते २५ टक्के शक्यता वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT